

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.5मे):-येथील थोर समाजसेवी, विविध सामाजिक व धार्मिक , सांस्कृतिक संस्थाचे मार्गदर्शक, अ. भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे माजी जिल्हा सेवाधिकारी डॉ. शिवनाथजी कुंभारे यांचे गेल्या २८ एप्रिल रोजी गडचिरोली येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचेवर कठाणी नदी घाटावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणालीनुसार गुरूकुंज आश्रम मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निर्मित पवित्र अस्थी कुंडात करण्यात आले.
सकाळच्या सामुदायिक ध्यानपाठानंतर आश्रमाच्या सामुदायिक प्रार्थना मंदिराचे पुढील प्रांगणात असलेल्या पवित्र अस्थी कुंडात दिवंगत डॉ. कुंभारे यांचे सुपुत्र डॉ. अनंता कुंभारे, तीनही मुली व जावई यांनी अस्थींचे विसर्जन केले. यावेळी मंडळाचे सरचिटणीस पद्मश्री जनार्दन बोथे गुरूजी, आध्यात्म विभाग प्रमुख डॉ. राजाभाऊ बोथे, कुंभारे परिवाराचे नातेवाईक, श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी भाऊ पत्रे, आजीवन प्रचारक आत्माराम आंबोरकर, जिल्हा संघटक सुखदेव वेठे, सल्लागार घनश्याम जेंगठे, मंडळाचे प्रचारक दिलीप मेश्राम, कवडू येरमे, भास्कर नरूले, सौ. सुनंदा वेठे, ओंकार वेठे, प्रचार प्रमुख गोपाल कडू आदींची उपस्थिती होती.
मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या श्रद्धांजली सभेत जनार्दन बोथे गुरूजी यांनी डॉ. कुंभारे यांच्या गडचिरोली जिल्ह्यातील आदीवासी बंधुप्रती दिलेल्या सेवाकार्याचा विशेष उल्लेख केला. तर प्रचार प्रमुख गोपाल कडू व अरविंद राठोड यांनी डॉ. कुंभारे यांनी सेवा मंडळाच्या संघटन व प्रचार प्रसार संदर्भात दिलेल्या योगदानाबद्दल विचार प्रस्तुत केले.डा.राजाभाऊ बोथे यांनीही डॉ. कुंभारे यांच्या सेवाभावी कार्याचे अनेक सुखद आठवणीचे स्मरण करत मंडळाचे वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. समन्वयकात्मक स्वरूपात आभार प्रदर्शन आत्माराम आंबोरकर यांनी केले.







