Home महाराष्ट्र आजची युवा पिढी

आजची युवा पिढी

19

आजची युवा पिढी मूळ संस्कृतीपासून दूर जात आहे, असे उद्गार आजकाल अनेक पालकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. “आजची पिढी समजून घेणे फार कठीण आहे,” असेही अनेकजण ठामपणे सांगतात. परंतु या विधानांकडे एकाच बाजूने पाहणे योग्य ठरणार नाही. कारण प्रत्येक पिढी ही तिच्या काळानुसार घडत असते. आजची युवा पिढी ही तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात वाढलेली असून तिची विचारसरणी, जीवनशैली आणि दृष्टिकोन हे पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा वेगळे असणे साहजिकच आहे. ही पिढी बुद्धिमान, चपळ, आत्मविश्वासी आणि स्वतःचे मत स्पष्टपणे मांडणारी आहे. त्यामुळे तिच्या बदलत्या स्वभावाकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता समजून घेणे अधिक आवश्यक आहे. तंत्रज्ञानाने आजच्या तरुणांच्या जीवनात मोठी क्रांती घडवून आणली आहे.

मोबाईल, संगणक, इंटरनेट, सोशल मीडियाच्या माध्यमातून जग त्यांच्या हातात आले आहे. माहिती मिळवणे, संवाद साधणे आणि नवीन कौशल्ये आत्मसात करणे या सर्व गोष्टी आज अतिशय सुलभ झाल्या आहेत. त्यामुळे आजची पिढी ज्ञानाच्या बाबतीत अधिक जागरूक आणि प्रगत आहे. मात्र, या तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे काही नकारात्मक परिणामही दिसून येतात. प्रत्यक्ष भेटीगाठी कमी झाल्या आहेत, संवादाचा स्वरूप बदलले आहे आणि नात्यांमधील भावनिक जवळीक काही प्रमाणात कमी झालेली दिसते. पूर्वीच्या काळात कुटुंबव्यवस्था अधिक घट्ट होती. सण-समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम यामध्ये सर्वजण एकत्र येत असत. नातेसंबंधांमध्ये जिव्हाळा आणि आपुलकी होती. आजच्या धावपळीच्या जीवनात मात्र वेळेची कमतरता भासते. प्रत्येक जण आपल्या कामात, शिक्षणात किंवा करिअरमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे नात्यांना पुरेसा वेळ देणे अनेकदा शक्य होत नाही. उदाहरणार्थ, पूर्वी एखाद्या वाढदिवशी किंवा विशेष प्रसंगी प्रत्यक्ष भेट देण्याची परंपरा होती, तर आज त्याच शुभेच्छा मोबाईलवरून दिल्या जातात. ही बदललेली जीवनशैलीच या फरकाला कारणीभूत आहे. आजची युवा पिढी आधुनिकतेकडे झुकत आहे.

नवीन विचार, नवीन संस्कृती आणि जागतिक पातळीवरील बदल यांचा स्वीकार करण्याची तयारी या पिढीत दिसते. हे सकारात्मक लक्षण असले तरी त्याचवेळी आपल्या परंपरा आणि संस्कृती जपणेही अत्यंत आवश्यक आहे. कारण संस्कृती ही केवळ परंपरा नसून ती आपल्या ओळखीचा भाग असते. जर ही ओळख हरवली, तर समाजाचे मूलभूत मूल्यही धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे आधुनिकतेचा स्वीकार करताना पारंपरिक मूल्यांचा आदर राखणे ही काळाची गरज आहे. युवा अवस्था ही व्यक्तिमत्त्व घडवण्याची अत्यंत महत्त्वाची वेळ असते. या काळात शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास वेगाने होत असतो. त्यामुळे योग्य सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. परंतु आज अनेक तरुण अयोग्य आहार, अनियमित दिनचर्या, उशिरापर्यंत जागरण या सवयींकडे झुकताना दिसतात. याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे मानसिक ताण, स्पर्धा आणि अपेक्षांचे ओझे यामुळे काही तरुण मानसिकदृष्ट्या अस्वस्थही होतात. त्यामुळे आरोग्याबाबत जागरूकता आणि संतुलित जीवनशैली अत्यंत गरजेची आहे.

तरुण वयात आकर्षणे आणि मोह निर्माण होणे स्वाभाविक असते. मित्रपरिवार, सोशल मीडिया, आधुनिक जीवनशैली यांचा प्रभाव तरुणांवर सहज पडतो. परंतु या सगळ्यात योग्य-अयोग्य याचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. संयम, शिस्त आणि जबाबदारी या गुणांचा विकास या टप्प्यावर होणे गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबातील संस्कार यांचा यात मोठा वाटा असतो. आजच्या तरुणांनी केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता समाजाप्रतीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. समाजकार्य, सामाजिक जाणीव, गरजूंना मदत करणे, पर्यावरणाचे संरक्षण यांसारख्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे केवळ समाजाचा विकास होत नाही, तर व्यक्तीचे व्यक्तिमत्त्वही समृद्ध होते. इतरांचा आदर करणे, सहकार्याची भावना ठेवणे आणि संकटाच्या वेळी धैर्याने उभे राहणे हे गुण प्रत्येक तरुणाने आत्मसात करायला हवेत. आजच्या तरुण पिढीत चांगले आणि वाईट असे दोन्ही पैलू दिसून येतात.

काही तरुण अत्यंत समजूतदार, जबाबदार आणि दूरदृष्टी असलेले आहेत, तर काहींमध्ये अजूनही परिपक्वतेचा अभाव दिसतो. यामागे त्यांच्या संगोपनाची पद्धत, मिळालेले संस्कार आणि वातावरण यांचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे पालक, शिक्षक आणि समाज यांनी मिळून तरुणांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे. शेवटी असे म्हणता येईल की, आजची युवा पिढी ही केवळ समस्यांचा भाग नाही, तर तीच भविष्यातील उपाय आहे. योग्य मार्गदर्शन, सकारात्मक विचार आणि संस्कार यांच्या जोरावर ही पिढी एक सुसंस्कृत, जबाबदार आणि प्रगत समाज घडवू शकते. त्यामुळे या पिढीकडे टीकेच्या नजरेने न पाहता, तिच्या क्षमतांना योग्य दिशा देणे हे आपले कर्तव्य आहे.

✒️लेखक:-भूषण सहदेव तांबे(मो:-9029258038)