

साप्ताहिक पुरोगामी संदेशचा चौदाव्या वर्षातील प्रथम अंक वाचकांपुढे सादर करतांना अत्यानंद होणे स्वाभिवकच असले तरी गेल्या तेरा वर्षातील यातना शब्दात मांडणे कठीण आहे. ही आमची भावना वाचक, हितचिंतक, वर्गणीदार, जाहीरातदार समजुन असल्याची जाणीव आम्हाला आहे. आज साप्ताहिक पुरोगामी संदेशची तेरा वर्षपुर्ती होत असतांना आम्ही काय कमाविले आणि काय गमाविले? याबाबत हिशेब करतांना ताळेबंद तपासले असता वाचक,जाहीरातदार, हितचिंतक यांच्या प्रेमाच्या जमेची बाजू भक्कम दिसते. गेल्या तेरा वर्षात वाचकांनी जे आम्हाला दिले ते आम्ही सांभाळुन ठेवण्याचा प्रयत्न केला.
…तु चिमुटभर देत असतांना
मी ओंजळ पुढे केली,
ते हव्यास म्हणुन नव्हे, तर
कणभरही सांडु नये म्हणुन…..
वाचकांनी दिलेली प्रेमाची देणगी आम्ही सांभाळुन ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो. त्यामुळेच आज पुरोगामी संदेशने गगन भरारी घेतली आहे. याचे सर्व श्रेय वाचक, जाहीरातदार, हितचिंतक यांना जाते. स्वातंत्र्य चळवळीत महत्वपूर्ण भुमिका घेणाऱ्या चिमुर (जिल्हा चंद्रपूर) या क्रांतीनगरीतून प्रकाशित होत असलेल्या साप्ताहिक पुरोगामी संदेशच्या उद्घाटन (दिनांक १३ मे २०१३) करते वेळी आमच्या मनात आनंदासोबत डोळयात अश्रु होते. हा प्रसंग तत्कालीन कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना आठवत असेल. अभिनवतेची कास धरुन नियमित (अखंड) अंक प्रकाशित करुन तेरा वर्ष आज पुर्ण झाली आहे. याबाबत आम्हाला आनंद होत
असतानाच भविष्यात आम्ही स्पर्धेत टिकु का? हा संभ्रम कायम आहे. परंतु संभ्रमावस्थेत जगण्यापेक्षा स्पर्धा करायचीच नाही. ‘चालत राहायचे, मार्ग सापडेल‘ या आशेवर आम्ही ठाम आहोत. स्पर्धा कशासाठी? स्पर्धेमुळे प्रेरणा मिळण्याऐवजी ताणतणाव निर्माण होत असेल तर मुळ उद्दिष्ट आणि होणारे परिणाम यातील तारतम्य पुन्हा-पुन्हा एकदा तपासुन पहायला हवे. स्पर्धेमुळे काही अंशी मूल्यमापन होते हे खरे असले तरी शेवटी हे मूल्यमापन सापेक्षच असते. हे मान्य करायला हवे. कोणत्याही स्पर्धेत सहभागी असलेल्या स्पर्धकांमध्ये एखाद्याने प्रथम क्रमांक मिळविला. याचा अर्थ तो जगातील सर्वश्रेष्ठ ठरत नाही. त्याच्यापेक्षा अधिक क्षमता असलेली एक नव्हे…तर अनेक व्यक्ती या स्पर्धेत उतरलेली नव्हती. या सत्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. रस्ता कधीच चालत नाही, रस्त्यावर आपल्यालाच चालायचे आहे. हा नियम/ध्येय आम्ही स्विकारले आहे. समताधिष्ठीत समाज निर्मितीचा ध्यास घेवून साप्ताहिक पुरोगामी संदेशच्या माध्यमातून वाटचाल करीत आहोत. माध्यमांच्या प्रवाहात जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाहीत ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. गेल्या तेरा वर्षात वाचकांचा प्रतिसाद उदंड मिळत आहे. बदलत्या तंत्र ज्ञानामुळे वाचकांची अभिरुची सुध्दा बदलली असल्यामुळे लिखित माध्यमा सोबतच दिनांक १७ जुन २०२० पासून www.purogamisandesh.in वेबसाईट सुरु केली आहे. या वेबसाईटवर दररोज विविध बातम्या, घडामोडी, वैचारीक लेख समाविष्ट करण्यात येत असतात. या डिजीटल नेटवर्क वेबसाईटच्या माध्यमातून साप्ताहिक पुरोगामी संदेश महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात पोहचला आहे. डिजीटल सोबतच मुद्रीत अंक सुध्दा आता वर्गणीदारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात जनतेची सेवा करीत आहे. आज महाराष्ट्रात आमचे चौतीस प्रतिनिधी कार्यरत आहेत, साप्ताहिक प्रिन्ट पेपर व डिजिटल पोर्टल असे माध्यम असताना सुद्धा आमच्या प्रतिनिधिनी पाठविलेल्या बातम्याना आम्ही न्याय देऊ शकत नाही, आमची मर्यादा आमचे प्रतिनिधी समजून घेत आहेत. ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे.
सन १९९३ पासुन आम्ही विविध वृत्तपन्नात काम केल्यामुळे पत्रकारिता क्षेत्रातील चांगले-वाईट अनुभव आमचे पदरी आहेत. शासकीय नियमाचे काटेकोर पालन व वाचकांच्या आशिर्वादामुळे महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृत पत्रकार म्हणून कार्यरत आहोत. महाराष्ट्र शासनाचे जाहिरात यादीत पुरोगामी संदेश समाविष्ट आहे. साप्ताहिक पुरोगामी संदेश यापुढे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कला-संस्कृती, साहित्य व अन्य रचनात्मक विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. वाचकांमधुन लेखक, पत्रकार तयार कसे होतील यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो. गेल्या तेरा वर्षात वाचक, वर्गणीदार, जाहीरातदार व हितचिंतकाच्या भरोश्यावर आम्ही यशस्वी वाटचाल केली आहे. साप्ताहिक पुरोगामी संदेशची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताचीच असतांना वाचक, वर्गणीदार, जाहीरातदार व हितचिंतकांनी याबाबत आम्हाला जाणीव होवू दिली नाही, यापुढेही उदार अंतकरणाने सर्वच साथ देतील अशी अपेक्षा बाळगणे व्यर्थ ठरणार नाही. आमच्या या प्रवासात ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केले त्यांचे आभार (आभार हे परक्याचे मानायचे असतात, इथे तर सर्वच आपले आहेत ) मानुन मोकळे होण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहणे आम्हाला आवडेल.

✒️सुरेश दौलतराव डांगे(संपादक-साप्ताहिक पुरोगामी संदेश)मो:-८६०५५९२८३०
Email : purogamisandesh@gmail.com
website: www.purogamisandesh.in







