Home महाराष्ट्र “रोजगार हमी” योजनेत प्रचंड गैरव्यवहार उघडकीस – प्रत्यक्ष कामावर मजूर नसल्याचे तारीख...

“रोजगार हमी” योजनेत प्रचंड गैरव्यवहार उघडकीस – प्रत्यक्ष कामावर मजूर नसल्याचे तारीख वेळेसह व्हिडिओ कॅमेरा चित्रिकरण 

115

✒️किशोर बावणे(विशेष प्रतिनिधी)

साकोली(दि.12मे):-महाराष्ट्र शासनाची रोजगार हमी योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे १०० दिवस “प्रत्येक हाताला काम, कायद्याप्रमाणे दाम” हे ब्रिद वाक्य असतांनाच संपूर्ण साकोली तालुक्यात रोहयो कामगार हजेरीपटाचा “३१० – २०० – ११०” असा मजुरीचा काळा गोरखधंदा उजेडात आला आहे. याविषयी “प्रतिनिधी” ने मौजा चारगांव, सुंदरी येथे प्रत्यक्ष जाऊन तारीख वेळसह व्हिडिओग्राफी घेतली असता सर्व १३० कामगार कामावर नव्हते. हा प्रकार समोर आला. यात सदर कंत्राटी कडून नेमका कामगारांच्या ३१० रू. मजुरीत कोणता गौडबंगाल होत आहे हे आता जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या उच्चस्तरीय चौकशी मध्ये समोर येणार आहे. 

              सध्या रोजगार हमी योजनेची गावोगावी कामे सुरू आहेत. यात पांदण रस्ते, विविध तलाव कामे सुरू आहेत. काही जागरूक जनतेच्या शंकेनुसार शनिवार ०९ मे ला “प्रतिनिधी” ने चारगावं सुंदरी येथील कामाला भेट दिली. यात रोजगार सेवकांनी सांगितले की, आज १३० कामगार कामावर आहेत. कामगार स. ७:३० ला जातात व भोजन सुट्टी ११ ते १२ ही असते. पण तिथे दु. १:३० ला कामावरील कॅमेरात तारीख वेळ लाऊन व्हिडियोग्राफी घेतली असता तिथे एकही मजूर नव्हते. गावात एका गल्लीत जेसीबी मशीन क्र. एम एच ३५ ए डब्ल्यू २५६१ ही गावातच उभी होती. मग प्रश्न हा पडतो की, सकाळी ७ वाजता गेलेले १३० मजूर अचानक गायब कसे झाले. याबद्दल एका महिला मजूराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “आम्हाला १०० रूपये देतात आणि सकाळी फोटो काढा व हजेरी लावा व घरी जा, संध्याकाळी ४ ला या आणि आपले १०० रू उचला” याचाच अर्थ असा की, कामगारांच्या नावावर हजेरीपट भरायचे, प्रत्येक मजूरी ३१० रूपये दाखवायची आणि मजूरांना १० मिनिटांसाठी बोलवून हजेरी फोटो काढून परत पाठवायचे. आणि उर्वरित २१० रूपयांचा कुणाकुणाला वाटणी करून हा शासनासोबत फसवणूकीचा खेळ करायचा.

अखेर अश्या या ४२० कामात साकोली तालुक्यातील किती गावे सामिल झाले आहेत.? किती रोजगार सेवक यात गुंतलेले आहेत. याची सखोल चौकशी होणे गरजेचे झाले आहे. यासंदर्भात काही जनतेने माहिती दिली आहे ती अशी की, एका कंत्राटदार मार्फत हे काम होत असून रोजगार सेवक निव्वळ कागदोपत्री हे मजूरांचे हजेरी पट दाखवितात. आणि प्रत्यक्षात काम हे मशीनने केले जाते. हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने साकोली तालुक्यात आता जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी याची सखोल चौकशी करून हा शासनासोबत व मजूरांसोबत फसवणूकीचा गोरखधंद्याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे. 

[ या प्रकारावर साकोली गटविकास अधिकारी पी. व्ही. जाधव सुट्टीवर होते, त्यांना मॅसेज देऊन प्रतिक्रिया मागितली असता उत्तर आले नाही. तसेच चारगांव सरपंच, व संबंधित कंत्राटदार यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली नाही ] 

“आज शनिवारी १३० लेबर आहेत, हजेरी घेतात व सर्व लेबर घरी येत आहेत. सर्व जागी असेच सुरू आहे, सुंदयीतही मातीकाम माझेच सुरू आहे. यांना पैसे इंजिनिअरच देत आहे ते मला माहित नाही”-नरेश लंजे (रोजगार सेवक,ग्रामपंचायत चारगांव सुंदरी)