

राज्यातील तापमानाचा पारा जसा वाढत चालला आहे तसा राज्यातील पाण्याचा साठाही आटत चालला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी तर सोडाच पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण झाले आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाच्या झळा जास्त जाणवत आहे. मराठवाड्यात अनेक मोठ्या प्रकल्पात पाणी साठा संपत आला आहे. राज्यातील धरण साठ्यातही सरासरी तीस ते चाळीस टक्केच पाणी शिल्लक आहे. फेब्रुवारीमध्ये राज्यातील पाणी साठा ६९ टक्के इतका होता तो आज ३३टक्क्यांवर आला आहे. राज्यभरातील धरणामधला सुमारे ३६ टक्के उपयुक्त साठा कमी झाला आहे त्यामुळे राज्यातील काही शहरांत चार ते पाच दिवसांतून एकदा पाणी सुटत आहे.
राज्यातील ४११ गावे आणि ११९४ वाड्या – वस्त्या टँकरवर अवलंबून आहेत. शासनाकडून ४६६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक गावांमध्ये विहिरी आणि बोअरवेल आटल्या आहेत त्यामुळे या गावात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. काही गावात आठ दिवसातून एकदा टँकर येतो तर काही गावात पंधरा दिवसातून एकदा टँकर येतो. पाण्यासाठी दाही दिशा अशी लोकांची अवस्था झाली आहे.
पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक तालुक्यात पाण्याची पातळी खालावली आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना कैक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. पाण्यासाठी नागरिकांवर दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. मुकी जनावरे आणि पक्षांना देखील पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने आणि स्कायमेटने वर्तवला असल्याने पाण्याचे मोठे संकट उभे राहू शकते. यावर्षी पावसाचे आगमन वेळेत होईल असाअंदाज वर्तवण्यात आला असला तरी यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहील असाही अंदाज वर्तवण्यात आल्याने दुष्काळाचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. अर्थात हे संकट केवळ पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण झाले असे नाही तर ती नियोजनातील त्रुटी, भूजलाचा अनियंत्रित उपसा, जलस्त्रोतांचे असमान वितरण आणि पाण्याचा अव्यवस्थित वापर या कारणामुळे देखील हे संकट ओढावले आहे. हे संकट आणखी गडद होऊ द्यायचे नसेल तर आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करायला हवे.
उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन त्याच्या वाटपाचे नियोजन केले पाहिजे. पुण्या – मुंबई सारख्या मोठ्या शहरात आजही २४ तास पाणी पुरवठा केला जातो. २४ तास पाण्याची चंगळ असल्याने कदाचित त्यांना पाण्याचे महत्व माहीत नसेल. पुण्या – मुंबई सारख्या शहरातील काही बेजबाबदार घटक पुरेसे पाणी मिळाल्यानंतर पाण्याची नासाडी करताना दिसतात. नळ खुले सोडून पाणी वाया घालवीत असतात. या शहरातील अनेक ठिकाणी पाण्याची नासाडी होताना दिसते. त्यामुळे या भागातही आवश्यक तितकेच पाणी सोडायला हवे. शहरातीलच नव्हे तर राज्यातील सर्वच नागरिकांनी पाणी जपून वापरायला हवे. भविष्यातील पाण्याचे संकट गांभीर्याने घेऊन पाण्याचा अपव्यय टाळला आणि काटकसरीने वापर केला तर ही वेळ निभावून नेता येईल. पाणी हेच जीवन आहे. थेंब न थेंब पाण्याची बचत केली पाहिजे. पाण्याची बचत करूनच आपण पाण्याची निर्मिती करू शकतो. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे. पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे.
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५







