

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.१८मे):-राजुरा ते भुरकुंडा बूज ही बससेवा अनेक दशकांपासून ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासाची महत्त्वाची जीवनवाहिनी म्हणून कार्यरत होती. काही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांपासून ते कामगार, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
सदर परिस्थितीचा गंभीर विचार करून माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी एस.टी. विभागाकडे बससेवा तातडीने सुरू करण्याचे निवेदन सादर केले.
यावेळी दिलीप देठे, उपसरपंच भुरकुंडा बूज, तसेच सौरभ मादासवार यांनीही चटप यांना सूचित करून “आमच्या गावाची बससेवा त्वरित सुरळीत सुरू व्हावी,” अशी विनंती केली. त्यांच्या सूचनेवर सकारात्मक प्रतिसाद देत चटप यांनी संबंधित विभागाकडे पुढाकार घेतला. चटप यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, “ही बससेवा सुरू झाल्यास केवळ भुरकुंडा बूजच नव्हे, तर मार्गातील सर्व गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
शैक्षणिक, आरोग्य, रोजगार व दैनंदिन प्रवासासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे.” ग्रामस्थांनी चटप यांच्या हस्तक्षेपाचे स्वागत केले असून एस.टी. प्रशासनाने त्वरित कारवाई करून बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी सर्व स्तरांतून अपेक्षा व्यक्त होत आहे.







