Home चंद्रपूर संस्कार शिबिराचा शानदार समारोप

संस्कार शिबिराचा शानदार समारोप

95

▪️प्रमुख उपस्थिती माजी सर्वाधिकारी लक्ष्मण गमे, गुरुकुंज मोझरी

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.१८मे):-श्री गुरुदेव सेवा मंडळ राजुरा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वांगीण बाल संस्कार निवासी शिबिराचा शानदार समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिनांक ६ मे ते १६ मे दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या परिसरात आयोजित या शिबिरात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील मुले-मुलींनी उच्च तापमानातही उत्साहाने सहभाग नोंदविला. शिबिराची सुरुवात दररोज सामुदायिक प्रार्थनेने होत होती. त्यानंतर सूर्यनमस्कार, योग, कराटे, लाठी-काठी, तलवार, दांडपट्टा यांसारख्या स्वसंरक्षण प्रशिक्षणासह विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक व आध्यात्मिक विकासावर विशेष भर देण्यात आला. भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी संत, ऋषी-मुनी व महापुरुषांच्या प्रेरणादायी जीवनकथांचा अभ्यासही विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कला, नेतृत्वगुण, वक्तृत्व आणि संघटन कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिबिरातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची निशुल्क सेवा डॉ. रितेश ठाकरे यांनी अत्यंत चोखपणे बजावली. त्यांनी आपला वाढदिवसही विद्यार्थ्यांसमवेत साजरा करत आमरसाची मेजवाणी दिली.

समारोपीय कार्यक्रमापूर्वी सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुकुंज मोझरीचे माजी सर्वाधिकारी लक्ष्मण गमे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी बालवयातील संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करत मुलांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकासासोबत आध्यात्मिक संस्कारांचीही नितांत गरज असल्याचे सांगितले. सुसंस्कृत व सजग नागरिक घडविण्याचे कार्य या संस्कार शिबिरातून होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक चंद्रपूर जिल्हा उपप्रचार प्रमुख ग्रामगीताचार्य मारुती सातपुते यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन चंद्रपूर जिल्हा उपसेवाधिकारी मोहनदास मेश्राम यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी योग, कराटे, मनोरे, लाठी-काठी, तलवार, दांडपट्टा यांची आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. हरिपाठ, भजन, गवळण आणि देवीच्या जोगव्याने परिसर भक्तिमय झाला होता.

योग व कराटे प्रात्यक्षिकांपूर्वी सादर करण्यात आलेल्या लघुनाटिकांनी रसिकांची उत्सुकता वाढवली, तर आगीच्या थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे डोळे दिपून गेले. अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत प्रशिक्षित शिक्षकांनी अथक परिश्रमातून तयार केलेला सुमारे तीन तासांचा कार्यक्रम अखंडपणे सुरू होता. मुख्य प्रशिक्षक ह.भ.प. गौरी विटोले व त्यांच्या संचासह गौरीताई यांच्या मातोश्री यांनी घेतलेल्या परिश्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

अनेक विद्यार्थ्यांनी शिबिरातील शिक्षण, निवास व भोजन व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त करत शिक्षक व आयोजन समितीचे आभार मानले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या समारोपीय कार्यक्रमाला गुरुदेव उपासक, सामाजिक कार्यकर्ते, पालक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गुरुदेव उपासकांच्या अथक परिश्रमातून हा भव्य कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.