

भारतीय प्रशासकीय सेवेतील धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्त झाली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सुप्त अवस्थेत असलेल्या नियमांची अतिशय कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यांनी राज्यातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना रस्त्यावरील वडापाव विक्रेते, भाजी विक्रेते, हॉटेल्स आणि मिठाई दुकानदारावर छापे टाकून वृत्तपत्राचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत थेट गुन्हे दाखल करणे किंवा मोठ्या रकमेचा दंड ठोकण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंढे साहेबांच्या आदेशानंतर FSSI आणि मुंबई महानगरपालिकेने ( BMC ) संयुक्त मोहीम हाती घेत अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. केवळ मुंबईतच नाही तर राज्यातील अनेक शहरात वृत्तपत्रात खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांवर सुरू केलेली ही धडाकेबाज कारवाई स्वागतार्ह आहे. या धडाकेबाज कारवाईचे जनतेतून स्वागतच होत असून या करवाईसाठी तुकाराम मुंढे साहेबांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे जाहिर आभारही मानले जात आहे. ही कारवाई सुरू झाल्यानंतर अनेकांना असे वाटले की वर्तमानपत्राच्या कागदात खाद्यपदार्थ देऊ नये हा तुकाराम मुंढे साहेबांचा आदेश आहे प्रत्यक्षात त्यांनी आधीपासून असलेल्या कायद्याची प्रभावी आणि कडक अंमलबजावणी केली आहे.
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देण्यावर कायद्याने बंदी २०१९ पासूनच आहे मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नव्हती. तुकाराम मुंढे साहेबांनी त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली ही कारवाई पुढे पण अशीच सुरू राहिली पाहिजे कारण खाद्यपदार्थ विक्रेते सर्रासपणे वर्तमानपत्राच्या कागदात भजे, वडापाव, पोहे, उपमा, इडली, डोसा, उडीदवडा, कच्छी दाबेली यासारखे गरम खाद्यपदार्थ बांधून देतात. भेळ विक्रेतेही वर्तमानपत्राच्या कागदातच भेळ बांधून देतात. पथारीवरील छोटे व्यावसायिकच नव्हे तर छोटे छोटे हॉटेल्स, बेकरी व्यावसायिक, स्नॅक सेंटर, स्वीट होम चालक, फेरीवाले खाद्यपदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्राचा कागद सर्रासपणे वापरतात.
टिश्यू पेपर किंवा किचन रोल्सच्या तुलनेत हा पर्याय स्वस्त असल्याने निवडला जातो मात्र ; असे करणे आरोग्यास हानिकारक आहे. वर्तमानपत्राचा किंवा मासिकाचा कागद अधिक आकर्षित करण्यासाठी डायआयब्युटाइल फटालेट आणि डायईन आयसोब्यूटाईल या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी केला जातो. हे केमिकल आरोग्यासाठी अतिशय घातक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. याशिवाय वर्तमानपत्राच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये शिसे, कॅडियम आणि झिंक यासारखे जड धातू असतात जेंव्हा गरम किंवा तेलकट पदार्थ ( कसे भजे, वडापाव, पोहे ) कागदावर ठेवले जातात तेंव्हा ती शाई वितळून अन्नात मिसळते. शाई मधील रासायनिक घटक पोटात गेल्यास पोटाचे विकार, यकृताचे आजार, किडनी निकामी होणे आणि दीर्घकाळात कॅन्सर सारखे गंभीर आजार होऊ शकतात.
अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी मध्यंतरी एक प्रयोग केला. या प्रयोगात त्यांनी वेष्टन म्हणून वापरल्या जाणाऱ्या कागदाचे पृथक्करण करण्याची पद्धत शोधून काढली. यानंतर या शास्त्रज्ञांनी विविध हॉटेल्स, उपहारगृहे यात फास्टफूड बांधून दिल्या जाणाऱ्या वेष्टनाच्या कागदाचे तसेच पदार्थांचे विश्लेषण केले तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की ज्या वेष्टनाच्या कागदावर छपाई केली आहे अशा वर्तमानपत्राचा आणि मासिकाचा कागद वापरलेले खाद्यपदार्थ ज्यांनी सेवन केले आहे त्या लोकांच्या पोटात अनेक घातक घटक गेले आहेत हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. हे घातक घटक शरीरात गेल्यावर ते कोणत्या अवयवात जाऊन कोणत्या प्रकारचे दोष निर्माण करतात यावरही त्यांनी संशोधन केले तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की घातक घटक ( केमिकल ) किडनी, यकृत, जठर आणि फुफ्फुसावर दुष्परिणाम करतात.
ब्रेडला आवरण म्हणून वापरला जाणारा कागद हा याबाबतीत सर्वाधिक घातक दुष्परिणाम घडणारा असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले असून त्याचे प्रमाण ५६ टक्के आहे तर बर्गर, सँडविच बांधून दिलेल्या कागदात ३२ टक्के घातक घटक असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवले. वर्तमानपत्राच्या कागदामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घातक घटक असतात. हे घातक घटक पोटात गेल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात म्हणूनच नागरिकांनी वर्तमानपत्रात बांधून दिलेले खाद्यपदार्थ खाणे टाळले पाहिजे. विक्रेत्यांनीही खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदात बांधून देण्याऐवजी टिश्यू पेपर किंवा किचन रोल्सचा वापर करावा. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेला हा आदेश अतिशय योग्य असून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.
✒️श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५







