Home महाराष्ट्र देवालयातील गर्दी वाढली, वाचनालये ओस पडली; साहित्यिकांनी लेखणी झिजवण्याची गरज – डॉ....

देवालयातील गर्दी वाढली, वाचनालये ओस पडली; साहित्यिकांनी लेखणी झिजवण्याची गरज – डॉ. संजय कळमकर

23

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहिल्यानगर(दि.10जून):-देवालयांमधील गर्दी वाढत असताना वाचनालये मात्र ओस पडत चालली आहेत. शाळांवर पत्रे आणि मंदिरांवर सोन्याचे कळस चढले आहेत. माणूस अधिकाधिक असुरक्षित होत असून त्याच्या असुरक्षिततेचा फायदा घेणारे धर्माचे ठेकेदार निर्माण झाले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी साहित्यिकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी केले.

शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात झालेल्या ‘बदलते ग्रामीण जीवन आणि ग्रामसंस्कृती’ या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी दादा पाटील महाविद्यालय, कर्जतचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, दैनिक लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके, साथी शिवाजी नाईकवाडी, प्रा. डॉ. सुधाकर शेलार, उपजिल्हाधिकारी गणेश मरकड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. कळमकर पुढे म्हणाले की, खेड्यापाड्यांतील माणसांमध्ये आजही माणुसकीचा झरा वाहत असल्याने ग्रामीण जीवन सकसपणे टिकून आहे. या जीवनाला अधिक सुसह्य आणि समृद्ध करण्यासाठी समाजाने प्रयत्नशील राहिले पाहिजे.

परिसंवादात आपले विचार मांडताना सुधीर लंके म्हणाले की, माणूस विचार करू शकतो आणि कार्यकारणभाव समजू शकतो म्हणून गावांची निर्मिती झाली. मात्र निसर्गातील समतोल बिघडला की विकृती निर्माण होते. आज ग्रामीण भागात अशाच विकृती निर्माण होताना दिसत आहेत. पूर्वी गावांची स्वतःची भाषा, परंपरा आणि ऋतुचक्राशी जोडलेली जीवनशैली होती. त्यामुळे समाज सुखी व समृद्ध होता. ग्रामसंस्कृती ही भारतीय संस्कृतीचा पाया असून ती टिकवण्यासाठी मानवता जपणे आवश्यक आहे.

प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी ग्रामीण संस्कृतीतील बदलांवर भाष्य करताना सांगितले की, वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे एकोप्याने राहणारे लोक आता एकमेकांकडे संशयाने पाहू लागले आहेत. विविध झेंड्यांच्या आधारे विभागणी होत आहे. युवा पिढीला कष्टाची लाज वाटू लागली असून महामार्गांसारख्या विकासकामांमुळे विस्थापित झालेल्यांचे प्रश्नही गंभीर होत आहेत. या नव्या सामाजिक प्रश्नांकडे साहित्यिकांनी सकारात्मक दृष्टीने पाहून त्यावर लेखन करणे गरजेचे आहे.

साथी शिवाजी नाईकवाडी म्हणाले की, रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणावर शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. या नव्या पिढीला योग्य दिशा देणे आवश्यक आहे. गावखेड्यांची संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी शहरात राहणाऱ्या लोकांनीही आपल्या मायमातीशी संवाद साधला पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब सावंत यांनी केले. प्रा. डॉ. अनिल गर्जे यांनी सूत्रसंचालन केले तर साहेबराव तुपे यांनी आभार मानले.

यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे, शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, तसेच संयोजन समितीचे संजय खामकर, परिमल निकम, जयंत गायकवाड, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, सुभाष सोनवणे, रवींद्र दानापुरे, प्रशांत सूर्यवंशी, राजेंद्र चोभे, प्रा. डॉ. अशोक कानडे, प्रा. अशोकराव दौंड, शर्मिला गोसावी, स्वाती ठुबे, जयश्री झरेकर, शर्मिला रणधीर यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते.