

माणूस जिवंत असताना त्याचं मोल कधीच कळत नाही, हे आपल्या समाजाचं सर्वात कडू आणि तितकंच सत्य चित्र आहे. एखादा माणूस आयुष्यभर प्रामाणिकपणे जगतो, लोकांसाठी धडपडतो, नात्यांसाठी झिजतो, कर्तव्य निभावतो पण त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप क्वचितच पडते. मात्र तोच माणूस या जगातून निघून गेल्यावर अचानक शब्दांचे पूर येतात “तो खूप चांगला होता… मनाने मोठा होता… कधी कुणाला दुखावलं नाही…” आणि मग सुरू होतं स्तुतीचं अखंड कीर्तन. जिवंतपणी न मिळालेला सन्मान, मृत्यूनंतर पुष्पहारात गुंडाळून दिला जातो. हा विरोधाभास फक्त भावनिक नाही; तो सामाजिक मानसिकतेचा आरसा आहे. आपण जिवंत माणसाला गृहित धरतो. त्याची सवय होते. त्याची उपस्थिती इतकी नित्याची वाटू लागते की त्याचं असणं आपल्याला “विशेष” वाटेनासं होतं. घरात आई रोज जेवण करते, ते तिचं कर्तव्य मानलं जातं; वडील आयुष्यभर कष्ट करतात, ते त्यांचं काम समजलं जातं; मित्र संकटात धावून येतो, ते मैत्रीचं नातं म्हणून गृहित धरलं जातं. पण हे सगळं अचानक थांबलं, की त्याचं मूल्य जाणवतं. अनुपस्थितीचं वजन, उपस्थितीपेक्षा जड असतं.
समाजाचं कौतुकाचं गणितही विचित्र आहे. जिवंत असलेल्या व्यक्तीचं कौतुक केलं, तर तो “डोक्यावर बसेल” अशी भीती. त्याचं यश मान्य केलं, तर आपली किंमत कमी होईल अशी शंका. त्यामुळे आपण शब्द आवरतो, भावना दाबतो, आणि प्रशंसा पुढे ढकलतो. पण मृत्यू आल्यावर स्पर्धा संपते, तुलना संपते, अहंकार शांत होतो आणि मग मोकळेपणाने स्तुती केली जाते. कारण आता त्या व्यक्तीकडून आपल्याला काहीच धोका नसतो. कौतुक रोखून धरण्याची ही वृत्ती नात्यांना आतून पोखरते. ज्या घरात, ज्या कार्यालयात, ज्या समाजात परिश्रमाचं, प्रामाणिकपणाचं, संवेदनशीलतेचं त्वरित कौतुक होत नाही, तिथे हळूहळू उत्साह मरतो. माणूस काम करतो, पण मनानं दूर जातो. तो हसतो पण आतून कोरडा होतो. कारण प्रत्येकाला पैशापेक्षा आधी शब्दांची गरज असते ती मान्यतेची, ओळखीची आणि आदराची.
आपण टीका करण्यामध्ये फार पुढे असतो; पण कौतुक करण्यात मागे पडतो. चूक दिसली की लगेच बोलतो “हे काय केलंस?”, “तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं.” पण चांगलं काम दिसलं, की शांत राहतो. जणू काही चांगुलपणाला प्रतिसाद देणं बंधनकारक नाही. ही मानसिकता बदलण्याची वेळ आता निघून चालली आहे. मृत्यूनंतरचं कौतुक हा खरं तर आपल्या उशिरा जागे झालेल्या संवेदनांचा पुरावा असतो. अंत्यसंस्कारात उभा राहून आपण ज्या भावना व्यक्त करतो, त्या जर जिवंतपणी व्यक्त केल्या असत्या, तर कदाचित अनेक नाती अजून घट्ट राहिली असती. अनेक तुटलेली मनं वाचली असती. अनेक माणसं नैराश्याच्या कड्यावरून परत आली असती. आजच्या धावपळीच्या जगात माणूस सर्वात जास्त कशासाठी भुकेला आहे, तर तो आहे ओळखीच्या एका वाक्यासाठी. “तू छान काम केलंस”, “तुझ्यामुळे फरक पडतो”, “तू आहेस म्हणून सोपं जातं” ही वाक्यं औषधासारखी असतात. ती आत्मविश्वास वाढवतात. ती जगण्याची उर्मी देतात. आपण मात्र शब्द जपून ठेवतो जणू ते खर्चिक आहेत. पण खरे तर न बोललेले शब्दच सर्वात महाग पडतात. सोशल मीडियाच्या युगात हा विरोधाभास अधिक ठळक दिसतो. एखादी व्यक्ती जिवंत असताना तिच्या पोस्टवर दोन शब्द लिहायला लोक कंजूषी करतात. पण तीच व्यक्ती गेल्यावर लांबलचक पोस्ट, आठवणी, फोटो, भावनिक परिच्छेद सगळं ओसंडून वाहतं. हे प्रेम खरं असतं; पण उशिरा आलेलं असतं आणि उशिरा आलेल्या प्रेमाचं दुःख असं असतं की ते ज्याच्यासाठी असतं, त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही.
आपण मुलांना शिकवतो, यशस्वी व्हा, मोठं व्हा, पुढे जा. पण आपण त्यांना हे शिकवत नाही की, जिवंत माणसाचं कौतुक करा. शाळेत गुणांना बक्षीस असतं; पण चांगल्या स्वभावाला किती वेळा दाद मिळते? कार्यालयात टार्गेट पूर्ण केल्यावर बोनस असतो; पण प्रामाणिक राहिल्याबद्दल किती वेळा अभिनंदन होतं? समाजात प्रसिद्धीला मान आहे पण शांतपणे काम करणाऱ्यांना किती वेळा व्यासपीठ मिळतं? माणूस मेल्यावर त्याला “चांगला” म्हणणं सोपं असतं; जिवंतपणी “तू चांगला आहेस” म्हणणं धैर्याचं असतं. कारण जिवंतपणी कौतुक केलं, तर आपल्याला स्वतःचा अहंकार बाजूला ठेवावा लागतो. दुसऱ्याचं मोठेपण मान्य करावं लागतं. आणि हे सगळ्यांना जमत नाही. नात्यांमधील अनेक दुरावे केवळ न बोललेल्या चांगल्या शब्दांमुळे निर्माण होतात. वडिलांनी मुलाचं कौतुक केलं नाही म्हणून मुलगा दूर जातो. पत्नीच्या कष्टांची दखल घेतली नाही म्हणून नातं कोरडं होतं. सहकाऱ्याच्या प्रामाणिक प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं म्हणून टीम तुटते. शब्द वाचवताना आपण माणसं गमावतो.
आपल्या संस्कृतीत मृत व्यक्तीबद्दल वाईट बोलत नाहीत, अशी परंपरा आहे. ती योग्य आहे. पण मग जिवंत व्यक्तीबद्दल चांगलं बोलण्याची परंपरा का नाही? श्रद्धांजली सभा भव्य होतात; पण कृतज्ञता सभा का होत नाहीत? स्मारकं उभी राहतात; पण जिवंतपणी सन्मान का उभा राहत नाही? आपण मृत्यूला आदर देतो पण जीवनाला पुरेसा आदर देत नाही. खरं तर, जिवंतपणी दिलेलं कौतुक हीच खरी श्रद्धांजली असते, माणूस जिवंत असताना त्याच्या अस्तित्वाची दखल घेणं. त्याच्या कष्टांना मान देणं. त्याच्या चांगुलपणाला शब्द देणं. कारण शब्दांमध्ये ताकद असते ते तुटलेलं मन जोडू शकतात, थकलेला जीव उभा करू शकतात. आज समाजात मानसिक ताण, नैराश्य, एकटेपण वाढतंय. लोक बाहेरून मजबूत दिसतात; पण आतून तुटलेले असतात. अशा वेळी औषधांपेक्षा जास्त परिणामकारक असतात ते प्रामाणिक कौतुकाचे शब्द, मान्यतेचा स्पर्श आणि आदराची नजर. आपण हे बदलू शकतो आज, आत्ताच. कोणासाठी मोठा कार्यक्रम करण्याची गरज नाही. फक्त मनापासून बोलण्याची गरज आहे. आईला सांगा “तुझ्यामुळे घर उभं आहे.” वडिलांना सांगा “तुमचा अभिमान वाटतो.” मित्राला सांगा “तू सोबत आहेस म्हणून धैर्य आहे.” सहकाऱ्याला सांगा “तुझं काम मोलाचं आहे.” कौतुक म्हणजे चापलुसी नाही. कौतुक म्हणजे सत्याची कबुली.
चूक भूल देणे घेणे हा नियम आयुष्यात ज्यांना जमला त्यांना जीवन कळले असं मी म्हणेन. वाधीसाठी म्हैस मारणारी माणसं अनेक बघितली पण सगळ्या चुका पोटात घालणारी आईसारखी दुसरी व्यक्ती शोधून सापडणं कठीण आहे. माणसं समजून घ्यायला शिका. एक ताई बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटी कापत होती. अचानक तिला बटाट्याच्या वरिल बाजुला छिद्र पडलेले दिसले. तिने विचार केला की बटाटा खराब झाला आहे तो फेकून द्यावा, पण तिने तो फेकून न देता खराब झालेला तेव्हढा भाग कापून फेकून दिला. पुन्हा पाहिले असता अजून थोडा भाग खराब दिसला. तिने तो भागही कापून फेकून दिला. उरलेला बटाट्याचा अर्धा भाग कापून भाजीत टाकला. किती चांगली विचारसरणी आहे, ७० पैशांचा बटाटा आपण किती ध्यान देऊन कापतो. जो भाग खराब आहे तो कापून फेकून देतो.
उरलेला भाग स्विकारतो. खुप चांगलं आहे हे. मात्र दुख या गोष्टीचं आहे की, आपण माणसाबाबत एव्हढे कठोर का वागतो? आपल्या जवळच्या एख्याद्या माणसाबाबत एक चुक दिसली तर त्याच्या पुर्ण व्यक्तीमत्वाला आपण कापून फेकून देतो. त्याच्या वर्षानुवर्षाच्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करतो. आपण फक्त आपल्या अहंकारासाठी, मी पणासाठी त्याच्यासोबतचे प्रत्येक नाते तोडतो. मग एकच प्रश्न पडतो की, आपल्या जवळच्या माणसाची किंमत सत्तर पैशांच्या बटाट्यापेक्षाही कमी आहे का? या छोट्याशा गोष्टीचा जरूर विचार करा आणि आपल्या जवळच्या अमुल्य माणसांना लहान लहान चुकांसाठी जीवनातून वेगळे करु नका. माणूस म्हणुनी जन्मा आलो, माणूस म्हणुनी जगेल मी, हे तत्व अमलात आणा.
समाज अधिक संवेदनशील होईल, ते मोठ्या भाषणांनी नाही; तर छोट्या प्रामाणिक वाक्यांनी. माणूस जिवंत असताना त्याला “तू चांगला आहेस” असं ऐकायला मिळालं, तर मृत्यूनंतरच्या हजार वाक्यांची गरजच उरणार नाही. शेवटी प्रश्न एकच की, आपण पुष्पहार द्यायचा की शब्दहार? माणूस गेल्यावर “तो खूप चांगला होता” म्हणणं सोपं आहे. पण तो समोर उभा असताना “तू खूप चांगला आहेस” म्हणण्याचं धैर्य दाखवू या. कारण जिवंत माणसाला दिलेला सन्मान हाच खरा पुरस्कार असतो आणि तो मृत्यूनंतर नाही, तर आयुष्यभर मिळायला हवा.
✒️प्रवीण बागडे(नागपूर)मो:-९९२३६२०९१९







