Home महाराष्ट्र चाणक्य अबॅकस अकॅडमी आयोजित राष्ट्रस्तरीय स्पर्धेतील गुणवंतांचा सत्कार

चाणक्य अबॅकस अकॅडमी आयोजित राष्ट्रस्तरीय स्पर्धेतील गुणवंतांचा सत्कार

154

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.23फेब्रुवारी):-चाणक्य अबॅकस अकॅडमी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गंगाखेड येथील अकॅडमीचे संचालक तानाजी चंदे यांच्या शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा (दिनांक २२ फेब्रुवारी रविवार) रोजी उत्साहात पार पडला.या कार्यक्रमामुळे परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक तुकाराम तांदळे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते तुकाराम बोबडे,शिक्षक गोपाळ मंत्री,संपादक उद्धव चाटे,शिक्षक तुकाराम हुरगुळे,शिक्षक निवृत्ती तांदळे,पत्रकार महेमूद शेख,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मस्के,शिक्षक उमेश काळे,शिक्षक बाळासाहेब शिंदे,शिक्षक सोपान बाबर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

याप्रसंगी व्याख्याते तुकाराम बोबडे यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानातून पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांची भूमिका किती महत्त्वाची असते,याबाबत त्यांनी सखोल विवेचन केले.पुढे बोलताना बोबडे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की,विद्यार्थ्यांच्या यशासाठी शिक्षक,विद्यार्थी आणि पालक यांचा त्रिसूत्री समन्वय अत्यंत आवश्यक आहे.तसेच चंदे सर यांच्या रूपाने विद्यार्थ्यांना यशाच्या शिखराकडे नेणारा प्रेरणादायी शिक्षक लाभला आहे,असे गौरवोद्गार त्यांनी काढले.मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अकॅडमीतील ३५ यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे ट्रॉफी,मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच जी.मेन्स परीक्षेत घवघवीत यश मिळवणारे चंदे यांचे माजी विद्यार्थी प्रथमेश तांदळे तसेच होमी भाभा परीक्षेची चौथी पातळी गाठणारी वैभवी हरगुळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवणारी कु.श्रुती प्रमोद मस्के हिला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली.तसेच राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक पटकावणारा स्वराज भरत कदम आणि पाचवा क्रमांक मिळवणारा प्रणव दीपक मोरे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास पाल्यांसह पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वैभवी हुरगुळे हिने केले,तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संचालक तानाजी चंदे यांनी मानले.राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या यशामुळे अकॅडमीचे सर्वत्र कौतुक होत असून विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची तालुक्यात छाप उमटवली आहे.