

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(सातारा)(दि.4फेब्रुवारी):-खानापूर तालुका जिप व पंचायत समिती निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाची सरशी होण्याची शक्यता आहे.
नगरपालिका निवडणुकी पाठोपाठ आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महत्वाचा घटक असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे खानापूर तालुका ढवळून निघाला आहे.या निवडणुकीत महायुतीतील शिंदेगट व भाजप या दोन्ही पक्षात निकराचा संघर्ष होत आहे.या निवडणुकीत महाआघाडी पुरती ढेर झाली असून त्यांचा एकही पक्ष अधिकृत चिन्हावर लढत नाही.त्या पक्षांनी शिवसेना शिंदेगटासमोर शरणागती पत्करली आहे. तर भाजपमधील वैभव पाटील व पडळकर गट हे दोन्ही गट एकत्रीत लढत आहेत.त्यामुळे त्यांचेही मनोबल वाढले आहे.
ग्रामीण भाग हा बाबर गटाचा नेहमीच बालेकिल्ला मानला जातो कारण ग्रामीण भागामध्ये पहिल्यापासूनच बाबर गटाचा जनसंपर्क विकास कामे जास्त राहिलेली आहेत मात्र हे सर्व असताना सुद्धा आणि विटा नगरपालिका एकतर्फी जिंकली असल्याने शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला आहे.
नागेवाडी जिप गटात बाबर घराण्यातील उमेदवार आहे.त्यांच्या विरोधात भाजपने सुजाता माने यांना उतरवले आहे.तर नागेवाडी पंचायत समिती गणामध्ये सुवर्णा भोसले शिवसेना व भाजपकडून चिखलहोळ गावच्या वर्षा गुरव या आमनेसामने आहेत.तर गार्डी गणात प्रतिभा शेंडे शिवसेना व भाग्यनगरच्या संगीता जगताप भाजपच्या यांच्यात लढत आहे.या गटात गावागावात बाबर गटाचे वर्चस्व पाहता ही लढत तिन्ही उमेदवार जवळपास एकतर्फी जिंकू शकतात.
दुसरीकडे लेंगरे गटामध्ये लेंगरेतील पंचायत समितीच्या मा.सभापती मनिषा बागल या शिवसेनेच्या तर भाजपच्या आरती मोरे या दोन्ही लेंगरे येथील स्थानिक उमेदवार असल्यामुळे जरी निकराचा सामना होणार आहे.लेंगरे गणामध्ये पायल कदम (शिवसेना) व स्वाती कदम ( भाजप) या दोन्ही उमेदवार भूड येथील आहेत.तर पारे पंचायत समिती अनुसूचित जाती महिला आरक्षित गणामध्ये तेजश्री लोखंडे (शिवसेना) व प्रियांका साठे (भाजप) यांच्यामध्ये सामना होईल.परंतू या मतदारसंघात सुशांत देवकर,मा.जि.प.सदस्या निलम सकटे,फिरोज शेख बाबासाहेब मुळीक,यांचे सहकार्य मिळाले आहे. पारे मध्ये बाबर गटाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे त्यातच आता बाबर गटांमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे त्यामुळे बालेकिल्ला असलेल्या लेंगरे गटात सुद्धा बाबर गटाचे उमेदवार निवडून येण्यास कोणतीही अडचण नाही. सर्वात संवेदनशील मतदारसंघ म्हणून
भाळवणी जिप गट ओळखले जातो.यामध्ये दोन्ही उमेदवार आळसंदमधील आहेत.शिवसेनेकडून हिम्मत जाधव तर भाजपकडून नितीन जाधव यांच्या निकराचा सामना होणार आहे तर भाळवणी पंचायत समिती गणामध्ये महेश घोरपडे (शिवसेना) व मोहन धनवडे (भाजप) हे दोन्ही उमेदवार भाळवणी गावातील आहे.तर आळसंद गणामध्ये कार्वे गावचे उपसरपंच रोशन जाधव (शिवसेना) व आकाश माने (भाजप) यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. या जिप गटात शिवसेना गटाची सरशी होण्याची शक्यता आहे.तर आळसंद गणामध्ये कॉग्रेस नेते रामराव दादा पाटील गटाला डावलल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
त्यामुळे येथे चमत्कार घडू शकतो.तर यावेळी नव्याने तयार झालेला करंजे जिप गटात यावेळी हाय होल्टेज सामना होणार आहे. यामध्ये बेनापूर येथील सई शिंदे (शिवसेना)या उच्चशिक्षित उमेदवार आहेत.यांच्याविरोधात मोहीच्या सुप्रिया खंदारे (भाजप) रिंगणात आहेत.तर करंजे पंचायत समिती गणामध्ये दोन्ही उमेदवार करंजे गावातील शिवाजी माने (शिवसेना) व पांडूरंग खोत (भाजप) हे लढत आहेत.तर बलवडी गणामध्ये बेनापूर येथील कॉग्रेस नेते व मा.जि.प.सदस्य सुहास शिंदे ( शिवसेना )व बलवडीचे मा.सरपंच तानाजी पाटील ( भाजप) यामध्ये अटीतटीची लढत होत आहे.या मतदारसंघात आ.गोपीचंद पडळकर यांची मोठी ताकद आहे.त्यामुळे शिवसेनेला कष्ट करावे लागत आहेत.या मतदारसंघात भाजपला निसटती संधी उपलब्ध आहे.विधानसभा, विटा, खानापूर नगरपालिका सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे.तसेच खानापूर तालुक्यातील
ग्रामीण भागातील बाबर गटाची ताकद,जनसंपर्क व विकास कामे आहेत तसेच राष्ट्रवादीच्या अजितदादा गट, कॉग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला असल्यामुळे बाबर गटाचे मनोबल उंचावले आहे.त्यामुळे शिवसेना जिप निवडणुकीत ३-१ अशी आघाडी तर खानापूर तालुका पंचायत समितीमध्ये ६-२अशा जागा जिंकून सत्ता काबीज करतील अशा अंदाज आहे.खानापूर तालुक्यात आ.सुहास बाबर व नगरसेवक अमोल बाबर यांचे वर्चस्व असल्याचे दिसून येईल.







