Home महाराष्ट्र गंगाखेड बस स्थानकामध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणीला सुरुवात

गंगाखेड बस स्थानकामध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणीला सुरुवात

315

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.28फेब्रुवारी):-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी)नोंदणी प्रक्रियेला गंगाखेड बस स्थानक येथे (दि.२८ फेब्रुवारी शनिवार) रोजी प्रारंभ करण्यात आला.भर उन्हामध्ये नोंदणीसाठी अमृत जेष्ठ नागरिकासह महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांचे आगार व्यवस्थापक अनिल निकाळजे,स्थानक प्रमुख कुंडलिक बर्गे आणि वाहतूक निरीक्षक दीपक मुंढे यांच्या हस्ते पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.एनसीएमसी कार्ड नोंदणीची प्रक्रिया एबिक्स कॅश कंपनीमार्फत राबविण्यात येत असून कंपनीचे प्रतिनिधी जगदीश खोतकर व संजय खोतकर हे काम पाहत आहेत.

या कार्डासाठी नोंदणी शुल्क १९९ रुपये असून,कार्ड प्राप्त झाल्यानंतर १०० रुपये भरावे लागणार आहेत.नोंदणी केल्यानंतर ३० दिवसांच्या आत संबंधित नोंदणी केंद्रावर कार्ड उपलब्ध होणार आहे.नोंदणीसाठी आधार कार्ड तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी यूडीआयडी कार्ड आवश्यक असल्याची माहिती वाहतूक निरीक्षक मुंढे यांनी दिली.राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने बस तिकीट व विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले आहे.

विद्यार्थी,दिव्यांग, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला,पुरस्कारार्थी अशा सुमारे ३५ प्रकारच्या प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात.यापूर्वी काही ठिकाणी खोट्या ओळखपत्रांचा वापर करून सवलती घेतल्या जात असल्याचे निदर्शनास आले होते.त्यामुळे योग्य प्रवाशालाच सवलतीचा लाभ मिळावा आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता राहावी,या उद्देशाने एनसीएमसी हे स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. या कार्डमुळे सवलतींची अचूक नोंद ठेवणे शक्य होणार आहे.

विविध प्रवर्गांसाठी विशेष सुविधा अमृत ज्येष्ठ नागरिक,सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड देण्यात येणार आहे.दिव्यांग प्रवाशांना यूडीआयडी क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड दिले जाईल.स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार व राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयातील मुख्यालय आगारामार्फत कार्ड वितरण करण्यात येणार आहे.

नोंदणीच्या पहिल्याच दिवशी १५० हून अधिक प्रवाशांनी नोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे गंगाखेड तालुका व परिसरातील महिला,ज्येष्ठ नागरिक,अमृत ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग,विद्यार्थी तसेच इतर सर्व सवलतधारक व सर्वसामान्य प्रवाशांनी गंगाखेड बस स्थानकावर येऊन एनसीएमसी कार्ड नोंदणी करून घ्यावी,अन्यथा सवलतीचा लाभ मिळणार नाही असे आवाहन बस स्थानक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कार्ड नोंदणी करण्यासाठी मशीन आणि मनुष्यबळ वाढवण्याची मागणी.

गंगाखेड बस स्थानक येथे सुरू असलेल्या एनसीएमसी कार्ड नोंदणी प्रक्रियेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.मात्र वाढत्या गर्दीमुळे नोंदणीसाठी वेळ लागत असून प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे एनसीएमसी कार्ड नोंदणी प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरळीत पार पाडण्यासाठी नोंदणी मशीनची संख्या वाढवावी तसेच अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती करावी,अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.अमृत ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग,महिला व विद्यार्थी यांना भर उन्हात रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागू नये,यासाठी स्वतंत्र काउंटरची सोय करावी,अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.