Home अमरावती ” संघर्षमय जीवनातील ” पूर्णतृप्त आंबेडकरी योद्धा मनोहर कौरती याना भावपूर्ण आदरांजली

” संघर्षमय जीवनातील ” पूर्णतृप्त आंबेडकरी योद्धा मनोहर कौरती याना भावपूर्ण आदरांजली

111

कर्मठआंबेडकरवादी आदिवासी नेता मनोहर कौरती. एक अफलातून माणूस मी स्वतः त्यांना काटोल-नरखेड मोवाड – कळमेश्वर शहरातील तहसील पोलीस स्टेशन पुढे कितीतरी आंदोलने करताना पाहीलं. आदिवासी नेता म्हणून त्यांची खास ओळख आहे एक सडपातळ उंच माणूस डोक्यावर दाट पांढरे विस्कळीत केस, चेहरा वर खालपर्यंत लोंबकणारी पांढरी दाढी अंगावर नेहमी मळकट पांढरी रेषेदार कुडता तर कधी लाल रंगाची बंगाली आणि निमुळता पैजामा , उजव्या पायाची पाचही बोटं तुटलेली म्हणून पायात रबरी बूट हातात नेहमी मोठी लाल रंगाची डायरी तर कधी -कधी अनवाणी -तर कधी फाटका बूट असा जातिवंत हाडामासाचा माणूस.काटोल तहसील पुढे वंदनाबाई बागडे यांची चहा कॅन्टीग म्हणजे आंबेडकरी व मार्सवाद्यांचे संसद भवनच. तिथे नेहमी कुणाचीही समस्या घेऊन आलेले मनोहर कौरती भाई. एक अशिक्षित माणूस पण डोक्यात आंबेडकरी विचारसरणी , सामाजिक – धार्मिक – आर्थिक क्रांतिकारी बीज ! आणि सोबत मार्क्सवादी विचारधारा वय वर्षे 78 वर्षाच्या योद्धाला मी काटोल शहरातील अनेक आंदोलनात निळा झेंडा कधी लाल झेंडा खांद्यावर घेऊन पाहिलं मग तो नामांतर लढा असो तरी जख्खड वयोवृद्ध माणसाने आंदोलनाला दिशाच दिली नाही तर गरिबांना न्याय पण दिला. मुंबईतील रमाबाई हत्याकांड असो की दिल्लीतील निर्भया प्रकरण कोपर्डी संघर्ष असो की गोधरा हत्याकांड असो भारताचे जबाबदार गृहमंत्री अमित शहाचा निषेध मोर्चा असो EVM विरोधात आंदोलन असो दिल्लीतील शेतकऱी आंदोलन असो या माणसाचे तहसील पुढे साखळी उपोषण ठरलेले असते.खैरलांजी हत्याकांडावर आंदोलन तीव्र करणारा अशिक्षित आदिवासी नेता कधी ग्रामपंचायत मध्ये पाणी प्रश्नासाठी आंदोलन करतो. शेत पादंनी साठी लढतो तर कधी विद्यार्थी नियमित बसेससाठी डेपो मध्ये निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा करतो.असे जवळ जवळ- 500 आंदोलनात निळा झेंडा घेऊन पाहिले आहे. जेलभरो आंदोलन केले तर नागपूर विधान भवनावर मोर्चा वेगळ्या विदर्भासाठी जीवाचं रान करणारा आदिवासी नेता निळा झेंडा खांद्यावर घेऊन पाहिला आहे. तर बहुजन समाज पार्टीच्या मीटिंग करिता आंदोलनात अनेकदा साथ दिली.

मनोहर कौरेती हे एका पायाने अपंग असूनही काटोल तहसील मधील प्रत्येक गाव पालथ घालून गल्ली झोपड्यात पोहोचले. गरीब आदिवासीना सोबत घेतले. जल जमीन जंगल आंदोलन केले. बिरसा मुंडा जयंती असो की डॉ आंबेडकर जयंती असो माइक वर आपले ओजस्वी विचार मांडणारा एक लढवय्या आता थकला आहे.

मनोहर दादा कौरती हे जरी पारडशिंगा गावचे असले तरी त्यांना अख्खा तालुक्यातील माणस जवळुन ओळखतात. निरश्वरवादीवादी वैचारिक वैधानिक दृष्टिकोन असलेला माणूस कधीच कोणत्या मंदिरात गेला नाही गोरगरिबांच्या प्रश्नासाठी जीवाचे रान करणारे मनोहर दादा कौरती साहेबांनी ऐन तारुण्यात एक प्रण केला मी लग्न करणार नाही— ते अजूनही अविवाहित आहेत -एक सामाजिक कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीतील ऊर्जावान योद्धा म्हणून गावकऱ्यांनी दखल घेऊन पारडसिंगा ग्रामपंचायत मध्ये बहुमताने निवडून आले सत्ताधारी असूनही त्याच ग्रामपंचायत पुढे पाण्यासाठी मोर्चा काढला. घागरा फोड आंदोलन व रस्ता रोको आंदोलन करावे लागले– काटोल शहरातील तहसीलदार असो ठाणेदार असो जिल्हा पोलीस अधीक्षक असो आमदार – खासदार – मंत्री असो या अशिक्षित माणसाला सफाईदारपणे बोलताना पाहिले— गोर गरिबाची भक्कमपणे बाजू मांडताना पाहिले. काटोल शहरातील शेतकरी संघटनेचे नेते काटोलचे नगराध्यक्ष दिवंगत विरेंद्रबाबु देशमुख यांच्या अनेक आंदोलनात कौरतीदादा पूढे असायचे शेतकरी संघटनेचे उदयमुख नेते राहुलबाबु देशमुख यांच्या आंदोलनात देखील पूढे असायचे आंबेडकरी नेते भिमरावजी बनसोड डिगांबर डोंगरे ,रवी दलाल, हर्षद बनसोड, विरेंद्रबाबु इंगळे बाबाराव वाघमारे, सुधाकर मानकर या सर्वानसोबत आंदोलनात पूढे असणारे मनोहर दादानी दुःखाची कैफियत कुठेच मांडू शकले नाही.आजीवन अविवाहित असल्याने त्यांना संसार नाही हक्काचं घर नाही. पण ते सध्या पारडसिंगा गावात सावत्र भावा जवळ राहतात. बिमार स्थितीत पडून असतात.

मी दि -28 /02 / 2025 रोजी मुद्दामहुन कौरती दादांची भेट घ्यावी म्हणून पारडसिंगा गावी गेलो. तर त्यांची परिस्थिती पाहून गहिवरलो .. आयुष्यभर दिन दलितांसाठी लढा देणारा माणूस आज हरला आहे. कॉम्रेडभाई बर्धन यांनीच त्यांची आदिवासी नेता म्हणून निवड केली होती पण या पठ्याने मार्क्सवादा सोबतच आंबेडकरवादी म्हणून जास्त मेहनत घेतली. आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक सरकार आली गेली पण या माणसाने कधीच कड बदलला नाही विचाराची माती होऊ दिली नाही. कधीच आंबेडकरी विचार सोडला नाही. ब्राह्मणवादा वर कठोर टीका करणाऱ्या या योद्धाने समझोता केला नाही राजकीय लोकांची जीहुजुरी पतकारली नाही.मी जेव्हा पारडसिंगा येथे घरी गेलो तेव्हा झोपडी वजा घर मातीच्या अर्धा खांडावर ठेवलेले तीनशे चारशे पुस्तके अनेक दुर्मिळ ग्रंथांचा संच रचून होता तर खाली वाकळी जवळ उशाच्या बाजूला ” डॉ. आंबेडकर लिखित थॉट्स ऑन पाकिस्तान ग्रंथ होता. घरची परिस्थिती खूपच बेताची,अंगावरचे फाटके जीर्ण कपडे आयुष्यभर त्यागाची साक्ष देत होते…सिंहाचा कलेजा असणारा हा योध्दा हतबल होऊन रडताना पाहिला. आपणास नम्र विनंती आहे की आजीवन अविवाहित राहून संघर्षवादी योद्धाला इच्छेनुसार प्रत्येकांनी मदत केली.तरी वैचारिक योध्दा ब्लड कॅन्सरसी लढा देत तडफडत गेला

मनोहरदादा कौरती यांना भावपूर्ण आदरांजली.!

✒️शब्दांकन:-प्रा.रवी दलाल 

▪️संकलन:-विद्रोही अविनाश गोंडाणे(अमरावती)मो:-९९२३२६४१९३