

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अमेरिकेने तेलासाठ्यासाठी व्हेनेझुएला या छोट्याशा देशावर दादागिरी करून त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचे अपहरण करून त्यांना अटक केली आणि स्वतःला व्हेनेझुएला या देशाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर त्यांनी इराणमधील आंदोलनांना हवा देऊन तो देश अस्थिर करण्याचा डाव आखला त्यात त्यांना यश न मिळाल्याने त्यांनी इस्रायलला सोबत घेऊन इराणवर अमेरिका मोठा हल्ला केला आणि त्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांना ठार मारले. अमेरिकेच्या या दादागिरीला इराणने जशास तसे उत्तर दिल्याने मोठ्या युद्धाला तोंड फुटले. हे युद्ध अजूनही चालू असून या युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी अमेरिका जगावर दादागिरी करत आहे.
अमेरिकेच्या या दादागिरीचा संपूर्ण जग निषेध करत असतानाच ट्रम्प यांची नजर क्युबा या छोट्याशा देशावर पडली आहे. व्हेनेझुएला आणि इराण नंतर कोण ? असा प्रश्न विचारला जात होता याचे उत्तर खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिले. ट्रम्प यांनी लॅटिन अमेरिकन नेत्यांच्या कार्यक्रमात बोलताना क्यूबातील कम्युनिस्ट सरकारला इशारा देत म्हटले आहे आहे की क्यूबाला स्वातंत्र्य मिळवून द्यायची वेळ आली आहे. क्यूबातील जनतेने स्वतःहून हे सरकार उलथवून लावावे अन्यथा अमेरिकेच्या कठोर कारवाईस सामोरे जावे. याचाच अर्थ अमेरिकेने जे इराणमध्ये केले तेच ते क्युबातही करतील. ट्रम्प यांच्या या इशाऱ्याचा क्यूबाच्या राष्ट्राध्यक्षांनी कठोर शब्दात निषेध केला असून अमेरिकेच्या संभाव्य आक्रमणाला तोंड देण्यासाठी आपली शस्त्र सज्जता वाढवली आहे. ट्रम्प यांनी असा इशारा केवळ क्युबालाच दिला आहे असे नाही काही दिवसांपूर्वी ग्रीनलँड या छोट्याशा देशालाही त्यांनी असाच इशारा दिला होता.
ग्रीनलँडने स्वतःहून अमेरिकेत विलीन व्हावे आणि जर ग्रीनलँड स्वतःहून अमेरिकेत विलीन झाला नाही तर अमेरिका लष्करी बळ वापरून त्या देशाला अमेरिकेत विलीन करेल अशी धमकी ट्रम्प यांनी ग्रीनलँडला दिली होती. इतकेच नाही तर जे देश ग्रीनलँडचे समर्थन करतील त्या देशांवर अमेरिका जबर आयात शुल्क अर्थात टेरिफ लावेल असा सज्जड दम देऊन त्यांना ब्लॅकमेल केले. ग्रीनलँडला समर्थन देणाऱ्या युरोपीय देशांना केलेले हे ब्लॅकमेलच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ब्लॅकमेली विरुद्ध युरोपात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. ट्रम्प यांच्या या दादागिरी विरुद्ध डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन आणि इतर शहरात हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि ग्रीनलँड हा विकाऊ देश नाही अशा घोषणा दिल्या. इंग्लंड, फ्रान्स या देशांनी देखील ट्रम्प यांच्या या धोरणावर टीका केली असून डोनाल्ड ट्रम्प यांनी ही दादागिरी थांबवावी असे निवेदन दिले. केवळ युरोपच नव्हे तर संपूर्ण जग अमेरिकेच्या दादागिरी विरुद्ध एकजूट होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिका खंडातही खदखद आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विस्तारवादी धोरणाविरुद्ध दक्षिण अमेरिका खंडातील देशातही मोठी नाराजी आहे. आज या देशांनी जाहीरपणे तसे बोलून दाखवले नसले तरी ते ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाराज आहेत. अमेरिकेतील नागरिकांनाही ट्रम्प यांचे हे विस्तारवादी धोरण मान्य नाही पण ट्रम्प आपली हेकेखोरी सोडायला तयार नाही. काहीही करून आपल्या शेजारी असलेल्या लहान देशांना अमेरिकेत विलीन करून घ्यायचे, तेल संपन्न राष्ट्रांवर ताबा मिळवून तेथील तेलासाठे ताब्यात घ्यायचे तसेच जे देश आपले ऐकणार नाही त्यांच्यावर जबर आयात शुल्क अर्थात टेरीफ लावून त्यांना ब्लॅकमेल करायचे आणि संपूर्ण जगावर आपली एकहाती हुकूमत गाजवायची हे ट्रम्प यांचे धोरण आहे आणि ट्रम्प यांचे हेच विस्तारवादी धोरण जगाला युद्धाच्या खाईत घेऊन जात आहे.
अर्थात हे आताच सुरू आहे असे नाही तर अमेरिका महासत्ता बनल्यापासूनच हा देश आंतरराष्ट्रीय नियम व कायदे पायदळी तुडवून इतर देशांमध्ये हस्तक्षेप करीत आलेला आहे. अमेरिकेने वेगवेगळी कारणे आणि सबबी पुढे करून इतर देशांवर युद्ध लादलेली आहेत. त्याची फार मोठी किंमत या देशांना आणि जगाला चुकती करावी लागली. खुद्द अमेरिकेलाही या युद्धाचे मोठे परिणाम सहन करावे लागले होते. व्हिएतनाम, अफगाणिस्तान, इराक युद्ध छेडून, त्यावर लाखो करोडो डॉलरचा चुराडा करून अमेरिकेने काय मिळवले असा प्रश्न अमेरिकेतही विचारला जात आहे. मात्र अमेरिकेने त्या काळात युद्ध सुरू करण्यामागील आपला स्वार्थ लपविण्यासाठी वेगवेगळ्या सबबी पुढे केल्या पण ट्रम्प मात्र आपण सुरू करीत असलेल्या युद्धा मागचा स्वार्थ लपवून ठेवण्याचेही सौजन्य दाखवायला तयार नाहीत.
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-9922546295







