Home गडचिरोली एसटीने केला गावांचा फेरफार !

एसटीने केला गावांचा फेरफार !

25

▪️देलोडाला डारली आणि डारलीला केला देलोडा : लूट होत असल्याची प्रवाश्यांना शंका !!

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.27एप्रिल):-जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील देलोडा आणि डारली या दोन गावातील अंतर अंदाजे 8 ते 10 किमी आहे. मात्र एसटी महामंडळाने दोन्ही गावांच्या नावात मोठा गोंधळ केला आहे, त्यामुळे प्रवाश्यांना फार मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. प्रवाशाने देलोडाची तिकीट काढली तर डारलीची तिकीट मशीनमधून काढून दिली जाते. तिकीटांवर स्पष्ट “गडचिरोली ते डारली” असे छापून येते.

तर डारलीची तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना “गडचिरोली ते देलोडा” अशी तिकीट मिळते. एसटी बसच्या या भोंगळ कारभारामुळे दररोज कुणी ना कुणी प्रवाशी कंडक्टरसोबत वाद ओढवून घेत असतो. देलोडा येथे उतरणाऱ्या प्रवाशाला आपल्याकडून 8-10 किमी अंतराचे ज्यादा पैसे घेतल्याची शंका उत्पन्न होऊन याचा जाब तो कंडक्टरला विचारतोच विचारतो. आणि होय, ते विचारलेच पाहिजे, अन्यथा शिकून असल्याचा उपयोगच काय? यावर सुपिक डोक्याचे कंडक्टर आरोप फेटाळून लावण्यासाठी भन्नाट कल्पना मांडतात, म्हणतात, “डारली कोठे आहे? पोर्लानंतरच तर डारली आहे ना ? पोर्लानंतर पहिलाच गाव देलोडा आहे, वडधानंतर डारली गाव आहे. मी तुम्हाला बरोबर उतरवतो, तुम्ही शांत बसा. ते आधीच मशीनमध्ये सेट करण्यात आले आहेत. त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. बोंबलून काहीच होणार नाही.” प्रवाश्यांचा यावर सडेतोड उत्तरासह आरोप असतो, “मशीन तयार होतांनाच ते सेट झाले नाहीत, तर आपल्यासारख्या सुपिक डोक्याच्या भन्नाट कल्पक तंत्रज्ञाकडून ते झाले आहे, माहित असुनही आपण ते परत दुरुस्त करून का घेत नाहीत. दुसर्‍याच गावाचे तिकीट देऊन आम्हाला तुम्ही लुटत आहात. त्यासाठीच ते तसेच चुकीचे कायम ठेवले आहात.”

     एसटी बसचा एवढाच प्रताप पुरेसा नाही. तर फलाटवर लावण्यात येणाऱ्या बसला पाटी असते, त्या पाटीवर लिहीलेल्या गाव व दरम्यानच्या गावांना ती बस जातच नाही, तर भलत्याच मार्गाने बस धावते. “गडचिरोली- देलोडा” पाटी असलेली बस गोगाव, साखरा, काटली, पोर्ला, देलोडा अशी न जाता ती खरपुंडी, आंबेशिवणी, वडधा, डारली, वैरागड, आरमोरी अशी धावते, असे म्हणत कंडक्टर साहेब आधी पाटी पाहून बसलेल्या सर्व प्रवाश्यांना उतरण्यास भाग पाडतात.

आहे की नाही गम्मत! मग अशा प्रसंगी प्रवाश्यांनी हसावे की रडावे?? सुशिक्षित प्रवाश्यांनी स्वतःच्या डोळ्यांवर तरी कसा विश्वास ठेवावा? कंडक्टरचे सांगणे ऐकून फक्त कानावरच विश्वास ठेवावा की काय? असे नानाविध प्रश्न आवासून उभे राहतात. पूर्वी या मार्गावर धावणाऱ्या बसेस म्हणजेच “गडचिरोली-डारली-आरमोरी” व “गडचिरोली-पोर्ला-रांगी” या होत्या. आता त्यांच्या अशा या बिभत्स रुपाचे प्रवाश्यांना दर्शन घडून दिशाभूल होत आहे, नव्हे नव्हे तर केली जात आहे, असेच वाटते. 

      मशीनमध्ये सेट करण्यात आलेली क्रमवार गावांची नावे फेरफार केलेली आहेत, ती सुज्ञ तंत्रज्ञाकरवी योग्य क्रमाने परत सेट करण्यात यावी, तसेच बसची पाटी योग्य त्याच गाव व मार्गावरील गावांच्या नावे असावी जेणेकरून प्रवाश्यांना धांदल व मनस्तापाचा सामना करावा लागणार नाही, अशी या द्वारे परिसरातील प्रवाशी- जनतेची एसटी महामंडळास विनंती आहे.