Home महाराष्ट्र वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

21

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.24एप्रिल):- श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ कराड या संस्थेचे संस्थापक भारताचे थोर सुपुत्र मा. यशवंतराव चव्हाण साहेब आणि संस्थेच्या स्थापनेपासून चेअरमन असलेले आदरणीय पी डी पाटीलसाहेब यांनी अखेरच्या श्वासापर्यंत संस्थेचा विकास केला. आज ही संस्था माजी सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. श्री. शामराव उर्फ बाळासाहेब पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. 

       या संस्थेचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड हे 1971 पासून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाचे केंद्र म्हणून लौकिकास आले असून शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारे हे महाविद्यालय समाजातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देत आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास, शिस्त, तसेच सामाजिक जाणीव निर्माण करण्यावर विशेष भर दिला जातो. महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालय, विस्तीर्ण क्रीडांगण आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध असून संशोधनाला देखील सक्रिय प्रोत्साहन दिले जाते.

तसेच, विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनविण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे वेणूताई चव्हाण कॉलेज हे केवळ शिक्षणसंस्था न राहता विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे एक प्रेरणादायी केंद्र ठरत आहे. या आठवणींना उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने “माजी विद्यार्थी मेळावा” रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात येत आहे. “पुन्हा स्नेहबंध जुळवूया…” या संकल्पनेवर आधारित हा मेळावा पार पडणार असून, महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आज पर्यंत च्या विविध वर्षांतील माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून जुन्या आठवणींना उजाळा देणे, तसेच परस्परांमधील स्नेह अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

       मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. संजय पुरुषोत्तम बदियानी (खजिनदार, श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराड) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. अरुण पांडुरंग पाटील (काका) (विश्वस्त व सदस्य, उच्च शिक्षण मंडळ) राहणार असून, प्रमुख उपस्थितीत मा. श्री. अल्ताफहुसेन नसिरुद्दीन मुल्ला जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड तसेच मा. श्री. जयंत पांडुरंग पाटील (काका) अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराड यांची उपस्थिती लाभणार आहे.

    महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) आर. आर. जाधव आणि माजी विद्यार्थी संघाचे सचिव श्री. व्ही. पी. धुमाळ यांनी या मेळाव्यास सर्व माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.