

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.29मे):-राजुरा पोलीस स्टेशन हद्दीतील डब्ल्यूसीएल कॉलनी, धोपटाळा टाउनशिप परिसरात एका 36 वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल रणधीर कुंभारे (वय 36) या आपल्या मुलीसह माहेरी धोपटाळा क्वार्टर क्रमांक 52/2 येथे उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त आल्या होत्या. 29 मेच्या मध्यरात्री 12.30 ते सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात इसमाने त्यांच्या घरात अनधिकृत प्रवेश करून धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत त्यांची हत्या केली.
या घटनेची तक्रार मृत महिलेचे पती रणधीर राजू कुंभारे यांनी राजुरा पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 103(1) आणि 332(अ) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा तसेच राजुरा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.
या खळबळजनक घटनेमुळे धोपटाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. राजुरा पोलीस या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास करीत आहेत.







