Home चंद्रपूर कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीला “राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार ”प्रदान

कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीला “राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार ”प्रदान

26

▪️शरद जोशी यांची संकल्पना साकार होत असल्याबद्दल आनंद – ॲड. वामनराव चटप 

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.27मे):- राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान, महाराष्ट्र मार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा “राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार – २०२६” हा पुरस्कार यावर्षी उत्कृष्ट शेतकरी संस्था या प्रवर्गातून राजुरा येथील कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीला प्रदान करण्यात आला.

                 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ शेतकरी नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी भूषविले. प्रमुख अतिथी ग्रामगीताचार्य तथा महाराष्ट्र शासनाचा “जिजामाता कृषी भूषण पुरस्कार” प्राप्त प्रगतशील महिला शेतकरी पौर्णिमा सवाई, श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. दिलीप काळे, राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश साबळे, निवृत्त कृषी अधिकारी अविनाश पांडे, सचिन राजुरकर, माजी नगरसेवक मधुकर चिंचोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रत्यक्ष संस्थेच्या कार्यस्थळी येऊन पुरस्कार प्रदान करतात. त्यानिमित्त कृषक स्वराज कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

               यावेळी बोलतांना ॲड. वामनराव चटप यांनी शरद जोशी यांनी शेतक-यांनी स्वत: कंपनी स्थापन करून कच्चा मालाचा पक्का माल तयार करून बाजारपेठेत नेण्याचे आवाहन केले होते. यामध्ये शेतकरी ते ग्राहक असा सरळ व्यवहार झाल्यास शेतक-यांना चार पैसे जास्त मिळतील आणि रोजगाराचे साधन निर्माण होईल. यासोबतच सीता शेती, माजघर शेती याही संकल्पना शरद जोशी यांनी मांडल्याचे ॲड. चटप यांनी सांगितले.

राजुरा येथे आता युवक समोर येऊन कार्य करीत असून शरद जोशी यांची संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यादृष्टीने कृषक स्वराज शेतकरी कंपनी चांगले कार्य करीत असल्याबद्दल ॲड. चटप यांनी त्यांचे कौतूक करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी पोर्णिमा सवाई यांनी शेतकरी केंद्रित, पर्यावरणपूरक व निरोगी अन्न उत्पादनाच्या दिशेने सुरू असलेल्या संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. प्रकाश साबळे यांनी समृद्ध शेतकरी, समतोल पर्यावरण आणि निरोगी ग्राहक या उद्देशाने कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनी करत असलेल्या कार्याचा विशेष उल्लेख केला.

               यावेळी कृषक स्वराज चे सतीश गिरसावळे, भाविक पिंपळशेंडे, अमेय धोटे, देवानंद गिरसावळे, प्रमोद वडस्कर, वैशाली आठवले, भास्कर धोटे, अंकित वडस्कर, अमोल भोंगळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.