Home महाराष्ट्र मूलभूत सुविधांच्या विषयांवर यशवंत सेनेचा विरोध; पाणीप्रश्नी सभेतच पलटी

मूलभूत सुविधांच्या विषयांवर यशवंत सेनेचा विरोध; पाणीप्रश्नी सभेतच पलटी

215

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

 गंगाखेड(दि.16मे):-येथे दिनांक १४ मे रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाशी संबंधित पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्ट्रीट लाईट, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, नालेसफाई आदी महत्त्वाचे विषय चर्चेस ठेवण्यात आले होते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या या विषयां वर प्रशासनाकडून कार्यवाहीला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना, यशवंत सेनेच्या नगरसेवकांनी अनेक ठरावांवर विरोधाची भूमिका घेतली.  

अजेंड्यातील एकुण ३२ विषय मंजुरीसाठी सभागृहात ठेवण्यात आल्यानंतर १७ ठराव मंजूर करण्यात आले, तर १५ ठराव यशवंत सेनेच्या नगरसेवकांकडून नामंजूर करण्यात आले. नामंजूर करण्यात आलेल्या ठरावांना सभागृहात १४ मते मिळाली, तर नगराध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून संबंधित ठरावांच्या मंजुरीसाठी ११ मते पडली.

विशेष म्हणजे शहराच्या पाणीपुरवठ्या संदर्भातील विषयावर सुरुवातीला तीव्र आक्षेप घेतल्यानंतर नंतर त्याच विषयावर भूमिका बदलत पलटी मारल्याची चर्चा सभागृहात चांगलीच रंगली. त्यामुळे “विरोधासाठीच विरोध केला जात आहे का?” असा सवाल अनेक सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला.

शहरातील नागरिकांना चांगले रस्ते, नियमित पाणी, सुरळीत लाईट व्यवस्था आणि स्वच्छता सुविधा मिळाव्यात यासाठी विविध विषय सभेपुढे आणण्यात आले होते. मात्र अशा मूलभूत सुविधांशी संबंधित कामांवरही राजकीय भूमिका घेतली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे आहे.