

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.20मे):-छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. संपूर्ण हिंदुस्थानच्या विशेषतः महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या जगण्याची ते एक प्रेरणा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक गोष्टींमुळं आणि त्यांच्यावर प्रकाशित झालेल्या हजारो ग्रंथांच्यामुळे आजही कित्येकांना स्फुरण चढत असतं. अशाच पद्धतीनं दादरमधील एक ७५ वर्षीय राजाभाऊ जाधव नावाची व्यक्ती आपल्या एका छंदातून ‘शिवराय कणा कणात, शिवराय मना मनात’ हा संदेश घेऊन आयुष्य जगत आहेत. शिवकाळाचा वेध घेणारी हजारो ग्रंथसंपदा असलेले वाचनालय आणि दुर्मिळ वस्तूंचा संग्रह त्यांनी स्वखर्चाने नालासोपारा येथे उभारला आहे.
आणि हे शिवकार्य समाजापर्यंत पोहोचावा आणि तरुण पिढीनं इतिहासातून प्रेरणा घ्यावी ही त्यामागची भूमिका आहे खरोखरच स्फूर्तिदायी आहे असे उदगार ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि अभ्यासक आप्पा परब यांनी काढले. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने श्री. राजा जाधव यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ग्रंथसखा सन्मान पुरस्कारआप्पांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी मोडी लिपीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लिप्यांतरकार भाऊ घाडीगावकर , मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, कार्यक्रमप्रमुख सुनील कुवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आप्पा परब पुढे असेही म्हणाले कि, छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनात घडलेल्या महत्त्वाच्या घटना हा माझ्या आवडीचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गेली तीनशे वर्षे स्वकीय आणि परकीय इतिहासकार, बखरकार, पोवाडे म्हणणारे सातत्याने बोलत आहेत व लिहित आहेत, मी सुद्धा वयाची ७ दशके शरीर साथ देत नाही तरी हे काम कुठेही त्याचा कंटाळा न आणता करीत आहे, त्यामुळे माझी शिवचरित्राचा वेगवेगळ्या अंगाने वेध घेणारी ३८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवाजीराजांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करणे, तो इतिहास अनेकांना सांगणे हा माझा परिपाठ आहे. मात्र त्या इतिहासापासून स्फूर्ती घेत विशेषतः तरुणांनी आपल्या आयुष्याची वाटचाल करावी असे मला वाटते.
यावेळी भाऊ घाडीगावकर यांनी शिवकाळ ते पेशवेकाळ यातील अस्सल मोडी कागदपत्रे यांचा आढावा सांगितला. अलीकडे मोडी शिकण्याकडे मराठी माणसाचा कल वाढल्याचे त्यांनी बोलून दाखविले आहे
राजा जाधव सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, आयुष्यात मी दहावीला २२ वेळा बसलो परंतु पास झालो नाही. माझी आई ही शिक्षिका तर मामा हे इतिहासाचा धांडोळा घेणारे लेखक होते. त्यांनी मला शालेय जीवनापासून शिवरायांच्या इतिहासाच्या वाचनाचे वेड लावले. मामांनी मला एक छोटे कपाट आणून दिले तेव्हापासून मी ग्रंथसंग्रह करू लागलो. एका बाजूला मुघल, आदिलशहा व कुतुबशहा यांच्याशी लढत असताना परकीय सत्ताधीशांशीही शिवाजीराजांना लढावे लागत होते. ब्रिटिश, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, सिद्दी या सर्वांशी शिवाजीराजांचा संबंध आला व सर्वांशी शिवाजीराजांनी संघर्षही केला.
मला यातून एक कळले ते म्हणजे सतराव्या शतकात मध्ययुगात कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज अविरत प्रयत्न करीत होते. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आजवर अनेक अजरामर ग्रंथकृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषांत प्रकाशित झाल्या आहेत. यातील नवी – जुनी शेकडो बहुतांशी पुस्तके माझ्या संग्रही आहेत. महाराजांच्या जीवनपटाशी, विचारांशी आणि इतिहासाशी संबंधित पुस्तके, दुर्मिळ चित्रे, नाणी, शस्त्रे यांचा मी संग्रह केला आहे.
मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवाजीराजांच्या कर्तृत्वाचा मोठेपणा समजण्यास ही चरित्रे अत्यंत उपयुक्त ठरली आहेत. शिवराय अमर्याद क्षमता असणारे राज्यकर्ते होते. आपल्या या राष्ट्रांत एवढी थोर विधायक विभूती दुसरी झाली नाही हे त्यांच्यावरील ग्रंथांतून आपणांस दिसून येते. हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य !







