

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.1जून):-तालुक्यातील नळदगते गोपा या रस्त्यावर बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणार्या तीन हायवा वाहनांवर पोलिसांनी धडक कारवाई करून सुमारे 90 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी वाहनचालक, मालक तसेच अवैध वाळू वाहतुकीचे सूत्रधार मानल्या जाणार्या संबंधितांविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दि. 31 मे रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास नळदगावपासून दक्षिणेस एक किलोमीटर अंतरावरील नळद-गोपा मार्गावर ही कारवाई करण्यात आली. शासनाच्या मालकीच्या गौण खनिजाची चोरी करून महसुलाचे नुकसान तसेच पर्यावरणाचा र्हास करत वाळूची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने सापळा रचून तीन हायवा वाहने ताब्यात घेतली.
कारवाईदरम्यान हायवा क्रमांक एमएच 03 सीपी 6537, एमएच 48 बीएम 1812 आणि एमएच 13 सीयू 9217 ही वाहने जप्त करण्यात आली. प्रत्येकी सुमारे 30 लाख रुपये किमतीच्या या वाहनांमध्ये वाळू भरलेली आढळून आली. या प्रकरणात वाहनचालक नसिर जानीमियाँ पठाण, मालक पठाण रिजवान खाँन इमाम खान, दुसर्या वाहनाचे चालक बालाजी वैजनाथ इंगळे व मालक विष्णू शिंदे व तीसर्या वाहनाचे चालक रामचंद्र राबवड व मालक यशवंत वाळके तसेच अवैध वाळू भरण्यास सांगणारे मुख्य सूत्रधार म्हणून रवि पंडीत आणि दिनेश परखड यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 303(2), 3(5), पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9 व 15, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईची फिर्याद पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील पोलीस हवालदार सूर्यकांत ताटी कोडलवार यांनी दिली आहे. कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन टर्के, पोहेकॉ शेख इशाद, यशवंत वाघमारे, चूडावकर, वावळे आदींचा सहभाग होता.
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे करीत आहेत. गंगाखेड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणार्यांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील नागरिकांकडून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे कौतुक करण्यात येत आहे.







