

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळव)मो:-8698566515
परभणी(दि.2जून):-जिल्ह्यासह सर्वच तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना एप्रिल,मे आणि जून २०२६ या तीन महिन्यांच्या धान्य वितरणात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्याने लाभार्थी आणि रास्त भाव दुकानदार दोघेही त्रस्त झाले आहेत.या पार्श्वभूमीवर धान्य वितरणासाठी मुदतवाढ देण्यात यावी तसेच वितरण प्रक्रियेत सुधारणा करावी,अशी मागणी रास्त भाव दुकानदार संघटनेचे जिल्हा सचिव प्रवीण रायभोळे यांनी दिनांक २ जून मंगळवार रोजी जिल्हाधिकारी परभणी यांच्यामार्फत अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे केली आहे
शासनाच्या ९ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशानुसार एप्रिल,मे व जून या तीन महिन्यांचे धान्य एकत्रितपणे वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.मात्र जिल्ह्यात अनेक दुकानदारांना एप्रिल महिन्याचे धान्यही वेळेवर उपलब्ध झाले नाही.जवळपास ४० ते ५० रास्त भाव दुकानदारांना १५ मे नंतर धान्य प्राप्त झाले.दुसरीकडे ई-पॉस मशीनवर एप्रिल महिन्याचे वितरण करण्याची अंतिम मुदत १५ मेपर्यंतच असल्याने धान्य उपलब्ध असूनही अनेक लाभार्थ्यांना धान्य देता आले नाही.
यानंतर शासनाच्या २५ मे २०२६ च्या पत्रानुसार मे आणि जून महिन्यांचे धान्य वितरण ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.मात्र २ जूनपर्यंतही अनेक दुकानदारांना मे व जून महिन्यांचे धान्य द्वारपोहोच झाले नसल्याचे प्रवीण रायभोळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
त्यामुळे लाभार्थी धान्यापासून वंचित राहत असून दुकानदारांना टीकेला सामोरे जावे लागत आहे.शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या जाहिरातींमधून तीन महिन्यांचे धान्य मिळणार असल्याची माहिती मिळत असल्याने ते दुकानदारांकडे धान्याची मागणी करतात.मात्र ई-पॉस मशीनवर आवश्यक डेटा उपलब्ध नसल्याने दुकानदारांना वितरण करता येत नाही.परिणामी लाभार्थी आणि दुकानदार यांच्यात गैरसमज निर्माण होत असून दुकानदारांनाच दोष दिला जात असल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे.
संघटनेच्या वतीने शासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत.एप्रिल महिन्याच्या धान्य वितरणासाठी किमान ८ ते १० दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी.मे महिन्याचे धान्य जास्तीत जास्त ७ जूनपर्यंत दुकानदारांकडे पोहोचवून वितरणासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी.जून महिन्याचे धान्य १५ जूनपर्यंत उपलब्ध करून त्याच्या वितरणासाठीही ३० जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी.
धान्य दुकानदारांकडे प्रत्यक्ष पोहोचल्याच्या तारखेपासून पुढील २० दिवस ई-पॉस मशीनवर वितरणासाठी डेटा उपलब्ध राहील,अशी स्वयंचलित (ऑटो) व्यवस्था विकसित करावी.यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञानाचा वापर करून धान्य प्राप्तीच्या तारखेपासून वितरणाचा कालावधी निश्चित केल्यास भविष्यात वारंवार मुदतवाढ देण्याची गरज भासणार नाही,असेही निवेदनात म्हटले आहे.
गरजू लाभार्थी आणि रास्त भाव दुकानदारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून केंद्र शासनाकडून एप्रिल,मे व जून २०२६ च्या धान्य वितरणासाठी मुदतवाढ मिळवून द्यावी,अशी मागणी जिल्हा सचिव प्रवीण रायभोळे यांनी केली आहे निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे.







