Home चंद्रपूर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित स्नेह मेळावा २०२६’ उत्साहात संपन्न

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित स्नेह मेळावा २०२६’ उत्साहात संपन्न

116

▪️पर्यावरण जनजागृती व मानवता विकास कार्यासाठी प्रा. डॉ. विठ्ठल आत्राम व मानवी करमणकर यांचा सत्कार

 ✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.8जून):-नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, नागपूर विभाग तथा जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ‘हरित स्नेह मेळावा – २०२६’ व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन आदर्श मराठी प्राथमिक विद्यालय, राजुरा येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेफडोचे नागपूर विभाग अध्यक्ष तथा उप मुख्याधिकारी नगर परिषद भद्रावती विजयकुमार जांभूळकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहरराव साबनानी, सचिव भास्करराव येसेकर, नेफडोच्या महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे, महिला सह सचिव रत्ना चौधरी, आदर्श मराठी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगो तसेच आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभुळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. रजनी बोढे व शुभांगी धोटे यांनी प्रभावीपणे केले. संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी प्रास्ताविकातून पर्यावरण संवर्धनाची गरज, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी स्मिता विरुटकर यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी पर्यावरण जनजागृतीसाठी आपल्या गीतांद्वारे उल्लेखनीय कार्य करणारे प्रख्यात गीतकार डॉ. विठ्ठल आत्राम यांचा तसेच मानवता सेवा उपक्रमांतर्गत नृत्य कोरिओग्राफी करून विद्यार्थिनी व महिलांना लावणीचे प्रशिक्षण देणाऱ्या मानवी भास्कर करमणकर यांचा शाल, रोपट्याची कुंडी व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमांत गणेश वंदना, लावणी, भारूड, गीतगायन तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी नाटिका सादर करण्यात आली. कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

पर्यावरण संरक्षणाचा संदेश आणि सामाजिक ऐक्याची भावना दृढ करणारा हा स्नेहमेळावा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संकल्प आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या विविध समित्यांनी अथक परिश्रम घेतले.