Home महाराष्ट्र लोणी येथे लोकवाचनालयाचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

लोणी येथे लोकवाचनालयाचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

20

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

  पुसद(दि.5जून):-तालुक्यातील लोणी येथे 4 जून रोजी लोकसहभागातून साकारलेल्या लोकवाचनालयाचे उद्घाटन फीत कापून पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले़.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागेश कॉम्प्युटर सेंटर, पुसदचे संचालक मिलिंद हट्टेकर होते. प्रमुख पाहुणे अनिल हटेकर यशवंत देशमुख, लोणी ग्रामपंचायतचे प्रशासक ,अनिल रत्ने, उपसरपंच रवी राऊत, सदस्य किशोर काळे, विठाबाई माहूरे, ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती राठोड, पोलिस पाटील विवेक कांबळे तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर मनवर उपस्थित होते.

गावातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दररोज पुसद येथे जावे लागत होते. अंतर, आर्थिक अडचणी तसेच मुलींना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठविताना पालकांना वाटणारी असुरक्षितता लक्षात घेऊन गावातील उच्चशिक्षित तरुणांनी पुढाकार घेतला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, होतकरू युवक, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने व ग्रामपंचायतीच्या मदतीने गावातील जुनी अडगळीत पडलेली ग्रामपंचायतीच्या इमारतीला पुनःबांधणी करून लोकसहभागातून हे वाचनालय उभारण्यात आले.

वाचनालयासाठी निधी संकलन करण्यासाठी गावात विशेष लेझीम रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वाचनालयाच्या उभारणीत बांधकाम कारागीर समाधान चिरमाडे, विद्युत कारागीर अविनाश बोडखे व राजकुमार बोखारे, फर्निचर कारागीर मधुकर मनवर तसेच वेल्डिंग कारागीर संजय कांबळे यांनी श्रमदान केले. गावातील अनेक नागरिकांनी आर्थिक मदत, पुस्तके, साहित्य व श्रमदानाच्या माध्यमातून योगदान दिले. तर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अनुकूल चव्हाण यांनी रुपये बारा हजार किंमतीचे पुस्तके भेट दिली.

उद्घाटनप्रसंगी बोलताना पोलिस अधीक्षक सेवानंद वानखेडे यांनी ग्रामीण भागातील वाचनालयांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील विविध प्रार्थनास्थळे व सार्वजनिक जागांचा उपयोग वाचनालये व अभ्यासिका उभारण्यासाठी व्हावा, असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात मिलिंद हट्टेकर यांनी लोकसहभागातून होणाऱ्या विकासकामांचे महत्त्व सांगत महिला सक्षमीकरण विषयावर मार्गदर्शन केले. तर प्रसिद्ध व्याख्याते यशवंत देशमुख यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून ग्रामसुधारणेत संत-महात्म्यांचे योगदान विशद केले आणि लोणी गावातील तरुणांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमात गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीमध्ये ८०.६० टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या वैभव राजकुमार खंदारे, द्वितीय श्रद्धा शिवाजी गायकवाड व तृतीय रोहिणी दिपक ढोले यांचा गौरव करण्यात आला. तसेच इयत्ता बारावीमधील प्रथम यश संदीप गजभार व द्वितीय निखिल शाम कांबळे यांचाही पालकांसह सत्कार करण्यात आला.

यावेळी लोकवाचनालयाचे व्यवस्थापन अजय बोखारे, पवन साठे व उदय बोडखे यांच्याकडे सोपविण्यात आले असून त्यांना वाचनालयाच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर बोडखे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नितीन केवटे यांनी केले.

लोकसहभागातून उभारलेले हे लोकवाचनालय ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 या कार्यक्रमाला गावातील महिला नागरिक व मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.