Home महाराष्ट्र रिपब्लिकन सेना अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन; शेकडो रिपब्लिकन सैनिकांच्या उपस्थितीत...

रिपब्लिकन सेना अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन; शेकडो रिपब्लिकन सैनिकांच्या उपस्थितीत ऐतिहासिक क्षण

19

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.6जून):-भारत भाग्य विधाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते रिबीन कापून रिपब्लिकन सेना अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी ऍडव्होकेट अमन आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो रिपब्लिकन सैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

अंधेरी-घाटकोपर लिंक रोड परिसरात सुरू करण्यात आलेले हे कार्यालय सामाजिक न्याय, संविधानिक मूल्यांचे रक्षण आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात अन्वर शेख, राखी वासनिक तसेच अन्य मान्यवरांनी आंबेडकरी चळवळ, सामाजिक परिवर्तन, संघटनात्मक बांधणी आणि मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करत एकजुटीची गरज अधोरेखित केली.

यावेळी बोलताना श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेब म्हणाले, “दलित आणि मुस्लिम समाजाची एकजूट निर्माण झाली, तर केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत मोठा बदल घडवण्याची ताकद निर्माण होऊ शकते. बहुजनांच्या सत्तेचा मार्ग संघटन, संघर्ष आणि सामाजिक ऐक्यातूनच तयार होतो.”

तसेच, हे कार्यालय केवळ नावापुरते न राहता जनतेच्या समस्या, अन्याय आणि अडचणी सोडवण्यासाठी कायम खुले राहील, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले की, “कार्यकर्त्यांकडून समस्या सुटल्या नाहीत, तर मी स्वतः त्या सोडवण्यासाठी पुढे येईन.”

श्रद्धेय आनंदराज आंबेडकर आणि ऍडव्होकेट अमन आंबेडकर यांच्या आगमनावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भांगडा ढोल, पारंपरिक नृत्य, फटाक्यांची अतिशबाजी, पुष्पवृष्टी, आरती आणि रेड कार्पेट स्वागतामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

यावेळी रिपब्लिकन सैनिक व विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर तसेच नवी मुंबईतील सामाजिक-राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले वीरेंद्र लगाडे यांच्या शिफारशीवरून अब्दुल शफिक शेख यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. श्रद्धेय आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते त्यांना पदाची सूत्रे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेख मुस्ताक, गुलामभाई, रज्जाक भाई, अफझल भाई तसेच संदीप जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले. स्वागत व्यवस्था, नियोजन, कार्यकर्त्यांचा समन्वय आणि संपूर्ण व्यवस्थापन प्रभावीपणे सांभाळत त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

कार्यक्रमानंतर निवडक पदाधिकाऱ्यांची एक खाजगी बैठक पार पडली. या बैठकीस श्रद्धेय आनंदराज आंबेडकर, ऍडव्होकेट अमन आंबेडकर, डॉ. राजन माकणीकर, अब्दुल शफिक शेख, संदीप जाधव, सूरज दिघे आणि अन्य काही पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संघटनात्मक विस्तार, आगामी कार्यक्रम आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती उपस्थितांकडून देण्यात आली.

कार्यक्रमाचा शेवट जय भीम, जय मिम, जय संविधान आणि सामाजिक एकतेच्या घोषणांनी झाला. उपस्थित कार्यकर्त्यांनी हे कार्यालय महाराष्ट्रभर सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे प्रभावी केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.