

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि. 26ऑक्टोबर):-शहरातील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योग्य संधी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात स्थानिक नगरपालिकेची निवडणूक लढविण्यासाठी गंगाखेड विकास आघाडीची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाने नेहमी मला मान-सन्मान दिला. आजही मी राष्ट्रीय समाज पक्षाचाच आमदार आहे. माझे नेते महादेव जानकर यांनी मला वेळोवेळी बळ दिले आहे. परंतु स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिती आणि शहरासह संपूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सत्तेत असणे गरजेचे आहे, याच भावनेतून माझ्यासह माझे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सविस्तर चर्चा महायुती सोबत राहाण्याचा निर्णय घेतला आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून सांगितले.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी माजी सभापती रविकांत (बाळकाका) चौधरी आणि रिपाईचे नेते डॉ.सिद्धार्थ भालेराव यांनी माझी प्रत्यक्ष भेट घेतली. तसेच माझ्याशी सविस्तर चर्चा केली. शिवाय, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही विनाशर्त आपल्या सोबत आहोत, अशी भूमिका मांडली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे स्वागत करून मी त्यांना सोबत घेतले आहे. परिणामी, येत्या काळात स्थानिक नगरपालिकेची निवडणूक आम्ही गंगाखेड विकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याचे घोषित केले. शिवाय, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षांसाठी आम्ही गंगाखेड विकासासाठी स्थापन करीत असून ज्यांना कुणाला आमच्या प्रयोगाला समर्थन द्यायचे आहे किंवा सोबत यायचे आहे, त्यांचे नेहमी स्वागत असेल.
लोकशाही मार्गाने पुढे जात असताना शहराच्या विकासालाच आम्ही सर्वोच्च प्राधान्य देणार आहोत. विरोधकांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे आम्ही कोणावरही टीका न करता केवळ विकासावर लक्ष केंद्रीत करू. शहरातील आतापर्यंत झालेली विकासकामे आणि भविष्यात होणार असलेले विविध प्रकल्प हीच आमची बाजू असेल. त्यामुळे केवळ राजकारण हाच आमचा अजेंडा नाही, तर विकास हाच आमचा अजेंडा आणि एकमेव ध्येय आहे. त्यासाठी शहराच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेऊन आम्ही सर्वच घटकांना सोबत घेऊन आगामी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी काळात स्थानिक नगरपालिकेची निवडणूक गंगाखेड विकास आघाडी या माध्यमातून लढवली जाणार आहे. हा प्रयोग पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारा आणि विकासकेंद्री विचारांना बळ देणारा ठरेल, असाही विश्वास आ.डॉ.गुट्टे यांनी व्यक्त केला. तसेच गंगाखेड विकास आघाडीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक नागरिकाला थेट सहभाग देण्याची संधी मिळेल आणि पारदर्शक, जबाबदार प्रशासन उभे करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही रिपाईचे नेते डॉ.सिद्धार्थ भालेराव यांनी नमूद केले. तर शहराचा विकास ही कोणत्याही पक्षाची मक्तेदारी नाही, तर सर्वांची अर्थात शहरातील सर्व नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे, म्हणूनच आम्ही एकत्र आलो आहोत, असेही कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रविकांत (बाळकाका) चौधरी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गंगाखेड विकास आघाडी ही कोणत्याही एका पक्षाची नव्हे, तर सर्व गंगाखेडकरांची आहे. जो कोणी शहराच्या प्रगतीसाठी खऱ्या अर्थाने काम करु इच्छितो, त्याचे मनापासून स्वागत आहे. लोकशाही पद्धतीने आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे ही आघाडी काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या विश्वासावर उभ्या राहिलेल्या या आघाडीचा हेतू गट-तट बाजूला ठेवून एकसंध विकास साधणे हा आहे. त्यामुळे आ.डॉ.गुट्टे यांनी आपले पत्ते उघडून मोठी राजकीय खेळी खेळली आहे. परिणामी, शहराचे राजकारण वेगळ्या वळणावर जाणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. तर दिवाळीनंतर राजकीय फटाक्यांची आतषबाजी करून गंगाखेड विकास आघाडीची घोषणा केल्यामुळे आ.डॉ.गुट्टे यांनी मोठा राजकीय ‘ॲटमबॉम्ब’ फोडला असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
यावेळी रविकांत (बाळकाका) चौधरी, रिपाई नेते डॉ.सिद्धार्थ भालेराव, मित्रमंडळाचे विधानसभा अध्यक्ष किशनरावजी भोसले, सभापती साहेबराव भोसले, उपसभापती संभाजीदादा पोले, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, मित्रमंडळाचे जिल्हा संपर्कप्रमुख बालाजी मुंडे, शहराध्यक्ष अकबर सय्यद, ज्येष्ठ व्यापारी अनिल यानपल्लेवार, प्रताप मुंडे, महावीरराजे भालेराव, रणधीरराजे भालेराव, सुशांत भैय्या चौधरी यांच्यासह शहरातील व्यापारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काका तुम्ही बांधाल तेच तोरण!
जनाईनगरी सारख्या राजकीयदृष्ट्या सजग शहरात कार्यतत्पर लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या विषयी सर्वसामान्य लोकांमध्ये असलेला आदर आणि नेतृत्वावरील विश्वास हीच त्यांची कमाई आहे. इथे मतदार फक्त उमेदवार पाहत नाहीत, तर त्यामागे असलेले ‘काका’ म्हणजे मार्गदर्शक नेतृत्व आणि प्रामाणिक माणूस. त्यामुळे आगामी काळात शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. म्हणून काका तुम्ही म्हणाल तेच धोरण आणि तुम्ही बांधाल तेच तोरण! अशा शब्दांत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रविकांत (बाळकाका) चौधरी यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.







