

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.27ऑक्टोबर):- शहरातील नगर परिषद हद्दीतील सर्वे नंबर 248 मधील महात्मा बसवेश्वर व्यापार संकुल, गंगाखेड येथे नगर परिषदेमार्फत दुसरा मजला बांधकामाचे काम सुरू आहे. या बांधकामासंदर्भातील कागदपत्रे एका निवेदनाद्वारे मागवूनही नगर परिषद प्रशासनाने माहिती न दिल्याने स्थानिक तीन संपादकांचे दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी तहसील कार्यालय, गंगाखेड समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
सदर प्रकरणी दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी नगर परिषद गंगाखेड यांच्याकडे बांधकामासंबंधी कागदपत्रे मागणीचे निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही माहिती देण्यात आली नाही. उलट नगर परिषद कर्मचारी बांधकाम अभियंता तांदळे साहेब यांनी “या बाबत आम्हाला काही माहिती नाही, मुख्याधिकारी यांनाच भेटा” असे सांगितल्याचे संपादकांनी नमूद केले आहे.
त्यानंतर दि. 17 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्याधिकारी यांना भेटण्याचा प्रयत्न करण्यात आला असता, ते निवडणुकीच्या कामानिमित्त बाहेर गेले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून मुख्याधिकारी सोनवणे साहेब त्यांच्या वॉट्स अँप नंबर वर निवेदन पाठवून माहिती देण्या विषयी विनंती करण्यात आली परंतु त्यानंतरही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने कागदपत्रांविषयी संशय निर्माण झाला असल्याचे व संबंधित बांधकामात काही गैरप्रकार असल्याचा संशय संपादकाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
त्यामुळे संपादकांनी नगर परिषद प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करत, दि. 28 ऑक्टोबर 2025 रोजी तहसील कार्यालय, गंगाखेड समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, “उपोषणादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील.”
उपोषणास बसणार असल्याच्या तक्रार अर्जावर उपोषणकर्ते उत्तम काळे, संपादक सा. शिवनेरी पत्र, प्रभु राठोड, कार्यकारी संपादक सा. कृषी रक्षक व विलास लांडगे, संपादक सा. मुक्ता न्यूज यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.







