Home महाराष्ट्र “सम्यक ज्ञान, दर्शन, चारित्र्य आणि तप यांची आराधना आवश्यक”

“सम्यक ज्ञान, दर्शन, चारित्र्य आणि तप यांची आराधना आवश्यक”

166

जैन तत्त्वज्ञानानुसार हाच जन्म नव्हे तर पुढील जन्माला देखील सुधारण्यासाठी आणि कर्मबंधापासून वाचणे तसेच मोक्षप्राप्तीसाठी सम्यक दर्शन, सम्यक विचार, सम्यक बोलणे आणि सम्यक प्रवृत्ती आवश्यक आहेत. सम्यक दर्शन म्हणजे आत्मा, कर्म, मोक्ष यावर योग्य श्रद्धा. सम्यक विचार म्हणजे सत्य आणि वास्तवाचे योग्य ज्ञान. सम्यक बोलणे म्हणजे संयमित वाणी वापरणे, खोटेपणा व निंदा टाळणे. सम्यक प्रवृत्ती म्हणजे बाह्य कृतीसह अंतःकरणातील इच्छा व आसक्तींवर नियंत्रण ठेवणे. हे चारही घटक परस्परावलंबी असून, जीवनात अंगीकारल्यास आत्मोत्कर्षाचा मार्ग खुला होतो. असे मोलाचे विचार प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा आणि प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनातून सांगितले. 

शारिरीक, मानसिक आणि आत्मिक अशा चार प्रकारचे रोग अस्तित्वात असतात. त्याची कारणे आणि त्यावरच्या उपायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मानवाला शारिरीक रोग आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे होतात. ८० वर्षांपूर्वी सर्व लोक श्रम करत असत. आज इतक्या मशीन व साधनांची उपलब्धता नसे त्यामुळे शारिरीक कष्ट होत असत व त्याकाळी लोक कमी आजारी पडत असत. आजच्या रोगाचे मूळ कारण श्रम न करणे होय. त्यासाठी दवाखाने व डॉक्टर्स इलाज करतात. मानसिक रोग आपल्या मनात नकारात्मक भाव ठेवल्याने उत्पन्न होतात त्यावर देखील भौतिक जगतात उपाय आहेत परंतु या दोन्ही रोगांची लागण न होण्यासाठी आत्मिक रोगी न होणे महत्त्वाचे असते.

आपण बांधलेल्या कर्माचा हिशेब ठेवला जातो. तुम्हाला स्वस्थ रहायचे असेल तर तन, मन स्वस्थ ठेवायचे असेल तर आत्मिक रोग न होऊ देणे यावर लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले गेले. आपण पूर्वी केलेले कर्म त्यांना नंतर भोजावेच लागतात. आम्हाला जैन धर्म, जिववाणी मिळालेली आहे त्याचा सदुपयोग करून या जन्माचे सार्थक करायला हवे. आपल्या घरात मुला-मुलींचे शुभविवाह ठरते पत्रिका तयार होते त्यावेळी भगवंताला स्मरण करतो का? परंतु दुःखद घटना घडली, कुणाचा मृत्यू झाला तर त्याला मात्र देवाज्ञा म्हणतो. सुखात आणि दुःखात परमेश्वराचे स्मरण ठेवणे महत्त्वाचे असते जे आज होताना दिसत नाही. आम्ही तर भगावान महावीरांचे मलं-मुली आहोत. सुख असो दुःख, अनुकुलता असो की प्रतिकुलता अशा वेळी मनात समभाव असणे अत्यंत आवश्यक असते.

कर्मापासून कुणीही वाचू शकत नाही परंतु कर्मबंधापासून वाचायचे असेल तर चार महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे व त्यावर आचरण करणे आवश्यक असते.कर्मबंधापासून बचाव करायचा असेल तर सम्यक विचार, सम्यक ऐकणे, सम्यक बोलणे आणि सम्यक प्रवृत्ती असणे म्हणजेच आचरण करणे या कृती करणे म्हणजेच कर्मबंधापासून स्वतःचा बचाव करणे होय. असे केले तर हाच जन्म नव्हे तर पुढील जन्माला देखील सुधारण्याची संधी आपल्याला प्राप्त होऊ शकते असे आजच्या प्रवचनात सांगण्यात आले.(ऑक्टोबर २७: २०२५,जळगाव, महाराष्ट्र)

✒️शब्दांकन:-किशोर कुलकर्णी(मो:-9422776759)