

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
▪️मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र पदवीधर मतदारांना विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन
राजुरा(दि.२९ऑक्टोबर):-भारत निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२५ या अहर्ता दिनांकावर आधारित नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे.
मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१( ३) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक ३० सप्टेंबर २०२५ प्रकरणपरत्वे नमुना १८ द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार यादींची छपाई २० नोव्हेंबर , प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी २५ नोव्हेंबर रोजी दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम १२ अंतर्गत २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे २५ डिसेंबर रोजी आणि मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ३० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात येईल.
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करण्यासंबंधी नमुना १८ मधील अर्ज स्वीकारण्याकरिता तहसीलदार , राजुरा यांची पद निर्देशित अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
तरी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करण्याबाबतचे दावे व हरकती ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहे. आपले नाव पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादी समाविष्ट करण्याकरिता पात्र असलेल्या पदवीधर मतदारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी केले आहे.







