Home महाराष्ट्र गाव घेता का गाव टाकळवाडी गाव काडले विक्रीला!

गाव घेता का गाव टाकळवाडी गाव काडले विक्रीला!

370

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

 गंगाखेड(दि.7नोव्हेंबर):-तालुक्यातील राणीसावरगाव या ग्रामपंचायती अंतर्गत असलेले टाकळवाडी हे छोटे गाव आज देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षे उलटून गेल्यानंतरही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे.विशेष म्हणजे आजच्या डिजिटल युगातही या गावाला जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता नाही, ही बाब केवळ गावकऱ्यांसाठी नव्हे तर प्रशासनासाठीही लाजिरवाणी ठरत आहे. म्हणून त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर टाकळवाडी गावच विक्रीस काढले आहे

गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी असंख्य आंदोलनांची मालिका छेडली.कधी उपोषण, कधी रास्ता रोको, तर कधी धरणे आंदोलन पण शासनाने नेहमीच दिलेले आश्वासन हवेतच राहिले इतकेच नव्हे तर अर्धनग्न आंदोलन, रस्त्यावर भजन, आणि पालकमंत्री ना. मेघना साकोरे (बोर्डीकर)यांना निवेदन देऊन गावकऱ्यांनी वारंवार आपली व्यथा मांडली.गावाच्या मुख्य रस्त्याअभावी शाळकरी मुले, गर्भवती महिला, रुग्ण यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.पावसाळ्यात तर गावाशी संपर्कच तुटतो. चिखलमय वाटा, ओढे आणि नाले पार करतच नागरिकांना दैनंदिन कामासाठी बाहेर पडावे लागते.

यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की,“आम्ही आंदोलन केलं,उपोषण केलं,निवेदनं दिली पण प्रशासनाचं लक्ष आमच्याकडे वळत नाही. आता आम्ही कंटाळलो आहोत. म्हणूनच आम्ही संपूर्ण टाकळवाडी गाव विक्रीसाठी काढण्याचा निर्णय घेतला आहे.” या संतप्त भूमिकेमुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरच टाकळवाडीचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

गावाच्या प्रवेशद्वारावर तसेच राणीसावरगाव बाजारपेठेमध्ये “हे गाव विक्रीसाठी आहे कारण रस्ता नाही!” असे फलक लावण्यात आले आहेत.टाकळवाडीच्या या हालअपेष्टा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा जिवंत पुरावा आहेत.एका बाजूला ‘विकसित महाराष्ट्र’चे स्वप्न रंगवले जाते, तर दुसऱ्या बाजूला टाकळवाडी सारखे गाव मूलभूत रस्त्यासाठी अजूनही झगडत आहेत.प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे