Home महाराष्ट्र मानवतावादी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी अ‍ॅड. डॉ. रमेश विवेकी यांची निवड 

मानवतावादी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी अ‍ॅड. डॉ. रमेश विवेकी यांची निवड 

164

▪️11 जानेवारीला कोल्हापुरात संमेलन : निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.12नोव्हेंबर):- जातीय, वर्गीय, लैंगिक आणि धार्मिक शोषणप्रक्रिया गतिमान होत असल्याच्या काळात मानवकेंद्री प्रागतिक विचारप्रक्रिया विकसित होण्यास सजग वातावरण निर्माण व्हावे. सामाजिक विषमतावादी मानवी विभागणीला छेद देण्यासाठी आणि मानवतावाद जोपासण्याच्या दृष्टिकोनातून मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने 11 जानेवारीला कोल्हापुरात होणार्‍या राष्ट्रीय स्तरावरील एकदिवशीय अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी लातूरचे ज्येष्ठ साहित्यिक, दिग्दर्शक आणि निर्माते अ‍ॅड. डॉ. रमेश विवेकी यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांनी दिली.

ॲड. डॉ. रमेश विवेकी गेली चाळीस हून अधिक वर्षे शिव, फुले, शाहू, आंबेडकर, कांशीराम यांच्या विचारांना आदर्श मानून विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. कवी, कथाकार, समीक्षक, संपादक म्हणून साहित्य क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. तमारोहक, सूर्यास्तव, दमन, टर्निंग पॉईंट या ग्रंथासह दहा हुन अधिक ग्रंथ त्यांच्या नावे आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव या पुरस्कारासह नावाजलेल्या अनेक पुरस्काराचे ते मानकरी राहिले आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लेखन म्हणून त्यांचे चित्रपट सृष्टीत ओळख आहे. हर्षकिरण प्रोडक्शनच्या वतीने मराठी चित्रपट निर्मिती मध्ये त्यांचे भरीव योगदान राहिले आहे.

मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने घेण्यात येणार्‍या या प्रबोधनपर वैचारिक व सैद्धांतिक साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी त्यांच्या साहित्य व कलेच्या क्षेत्रातील दखलपात्र योगदानाची नोंद घेऊन बहुमताने निवड करण्यात आली आहे.

सदर संमेलनास देशभरातून प्रागतिक विचारांचे साहित्य व कलेच्या क्षेत्रातील कवी, लेखक, साहित्यिक, समीक्षक, कलावंत, कार्यकर्ते, नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

सदर साहित्य संमेलनात मानवतावादी साहित्य आणि कला यावर हितगुज व चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.

आपली अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी अ‍ॅड. डॉ. रमेश विवेकी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

                                            पत्रकार परिषदेला अंतिमा कोल्हापूरकर, गंगाधर म्हमाने, अर्हंत मिणचेकर, सिद्धार्थ तामगावे, अभिजीत मासुर्लीकर, सिद्धार्थ कांबळे, आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर आदी उपस्थित होते.