

▪️हिवरखेड महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र ८ दिवसात स्थलांतरित करा !
▪️राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आंदोलनाचा ईशारा !
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.18नोव्हेंबर):-शेतक-यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा व वातावरणातील बदलामुळे होणारे शेतीचे संभाव्य नुकसान टाळता यावे, या उद्देशाने शासनाच्या वतीने स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने मोर्शी तालुक्यातील हिवरखेड महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु हिवरखेड मंडळातील स्वयंचलीत हवामान केंद्र मंडळाच्या मध्यभागी दापोरी येथे न बसविता मोर्शी तालुक्यातील अखेरच्या टोकाला बसविल्यामुळे हिवरखेड मंडळातील फळ पीक विमा काढलेल्या हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विमा मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केला आहे.
मात्र हिवरखेड मंडळामध्ये उमरखेड येथील फळरोप वाटिकेमध्ये बसविलेल्या हवामान केंद्राच्या परिसरामध्ये संत्रा झाडांची लागवड केलेली असून तेथील संपूर्ण परिसर ओलिताखाली राहत असल्यामुळे कमी तापमान जास्त तापमानाची योग्य नोंद होऊ शकत नसल्यामुळे हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ हिवरखेड महसूल मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर येत आहे. त्यामुळे विमा कंपनीचा कोट्यावधी रुपयांचा फायदा होत असल्याचे निदर्शनास येत असून स्वयंचलित हवामान केंद्र विमा कंपनीच्या फायद्यासाठी आहे की शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हे कळायला मार्ग नाही.
हिवरखेड मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र ८ दिवसामध्ये दापोरी परिसरामध्ये बसवून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळऊन द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, उपविभागीय कृषी अधिकारी उज्वल आगरकर, तालुका कृषी अधिकारी पुरुषोत्तम माने यांना निवेदन देऊन देण्यात आला.
स्वयंचलित हवामान केंद्र कुणाच्या फायद्यासाठी ?
शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा आणि शेतीचे संभाव्य नुकसान टळावे, या उद्देशाने उभारलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थिती गंज चढल्यागत झाली आहे़ ग्रामीण भागातील मंडळ कार्यालयांतर्गत उभारलेल्या या हवामान केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत़ हवामानाची नोंद घेणारे काही यंत्रे झुडपामध्ये झाकून गेली असून हवामान केंद्र चुकीच्या ठिकाणी बसविल्यामुळे हवामानाची अचूक नोंद होणार कशी? याबाबत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या गंभीर प्रकारामुळे फळ पीक विमा धारक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असुन विमा कंपनीचा कोट्यावधी रुपयांचा फायदा होतांना दिसत आहे — रुपेश वाळके अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.







