Home महाराष्ट्र पुसेगावमधील रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

पुसेगावमधील रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

135

✒️नितीन राजे(विशेष प्रतिनिधी)

खटाव ( सावा) : पुसेगाव शहरातून जाणाऱ्या सातारा-टेंभुर्णी ५४८ सी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत येथील श्री सेवागिरी रयत संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांना निवेदन देण्यात आले. अर्धवट सोडलेल्या कामामुळे स्थानिक रहिवाशांसह प्रवासी, वाहनचालक आणि भाविक-भक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने त्वरित काम सुरू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, दोन महिन्यांपूर्वी पुसेगाव शहरातील येरळा नदी पूल ते डॉ. सुरेश जाधव यांचे दवाखान्यापर्यंत अंदाजे पाचशे मीटर महामार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र यात्रेच्या कारणास्तव हनुमान मंदिर चौक ते श्री सेवागिरी मंदिरापर्यंतचे काम थांबविण्यात आले. होते. सध्या यात्रा कालावधी संपला असून संबंधित कंपनीला हे रखडलेले काम पूर्ण करण्याच्या तत्काळ सूचना द्याव्यात. तसेच गरज पडल्यास हा रस्ता पूर्ण करण्यासाठी बाधित लोक, सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्तिक बैठकीचे आयोजन करावे, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, या मागणीची दखल घेऊन प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना त्वरित पत्रव्यवहार करण्याच्या सूचना केल्या आहेत. लवकरच पुसेगाव ग्रामस्थ, बाधित लोक लोकप्रतिनिधी, संबंधित विभागाचे जबाबदार अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सदरचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी ठोस उपाययोजना करणार असल्याची ग्वाही यावेळी प्रांताधिकारी मॅडम यांनी ‘रयत’ संघटनेचे श्री.गौरव जाधव,संदीप जाधव,सचिन देशमुख व गणेश जाधव यांनी सांगितले.