Home Breaking News नेवजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

नेवजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

129

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.8जानेवारी):-स्थानिक नेवजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदी व सांस्कृतिक वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणारा हा सोहळा पाहण्यासाठी पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय अशोकजी भैया यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. प्रा. डॉ. धनराज खानोरकर सर, मराठी विभाग प्रमुख, ने.ही. महाविद्यालय, ब्रम्हपुरी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य प्रा. सुभाषजी बजाज हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सहसचिव भास्करराव उराडे, पालक-शिक्षक समितीचे उपाध्यक्ष विजयजी बनपूरकर उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक के. एम. नाईक सर, उपमुख्याध्यापक श्री. ए. डब्ल्यू. नाकाडे सर व पर्यवेक्षक पी. आर. जीभकाटे सर यांची मान्यवर उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने झाली. प्रास्ताविकात मुख्याध्यापक के. एम. नाईक सर यांनी स्नेहसंमेलनाचे शैक्षणिक, सांस्कृतिक व संस्कारमूल्य स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. धनराज खानोरकर सर यांनी आपल्या प्रभावी व विनोदी शैलीत विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व, अभ्यासाचे मूल्य तसेच मोबाईलच्या अति वापरामुळे होणारे दुष्परिणाम अत्यंत समर्पक उदाहरणांतून समजावून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मचिंतनाची भावना निर्माण झाली.

संस्थेचे सचिव अशोकजी भैया यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याची संस्थेची बांधिलकी अधोरेखित केली. अध्यक्षीय भाषणात प्रा. सुभाषजी बजाज सर यांनी प्रामाणिकपणा, जिद्द, सचोटी व नैतिक मूल्ये हीच विद्यार्थ्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे सांगितले.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेली गणेश वंदना, सामूहिक नृत्ये व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर आनंदाने भारावून गेला.

स्नेहसंमेलनाच्या शेवटच्या दिवशी बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा. ॲड. प्रकाशजी भैया हे उपस्थित होते. बक्षीस वितरक म्हणून रमेशजी भैया, माजी मुख्याध्यापक राऊत सर, बुरले मॅडम व इक्बाल शेख यांची उपस्थिती लाभली. क्रीडा, सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून गुणगौरव करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात ॲड. प्रकाशजी भैया यांनी बक्षिसे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा असल्याचे नमूद केले.

या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक के. एम. नाईक यांनी केले, सूत्रसंचालन बालपांडे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक ए. डब्ल्यू. नाकाडे सर यांनी केले.

हा स्नेहसंमेलन सोहळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारा, त्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि शाळेच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची साक्ष देणारा ठरला, अशी भावना उपस्थित मान्यवर व पालकांनी व्यक्त केली.