

✒️प्रतिनिधी गंगाखेड(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.8जानेवारी):-शहरातील नागरिक आधीच धुळीच्या समस्येमुळे हैराण झाले असतानाच आता वाहतूक कोंडीने नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे.नुकत्याच पार पडलेल्या गंगाखेड नगरपरिषद निवडणुकीत धुळीचा मुद्दा चांगलाच गाजला मात्र प्रत्यक्षात आजही नागरिकांना ना धुळीपासून दिलासा मिळाला आहे,ना वाहतूक कोंडीपासून.
गंगाखेड शहरातील मुख्य रस्त्यांवर हातगाडे,ऑटो रिक्षा,दुचाकी व चारचाकींच्या बेशिस्त पार्किंगमुळे पन्नास फुटांचे रस्ते आज दहा फुटांवर येऊन ठेपले आहेत.शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे चित्र दिसून येत असून,जोपर्यंत ही अतिक्रमणे हटवली जाणार नाहीत,तोपर्यंत वाहतूक कोंडी कायम राहणार असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.नवनिर्वाचित नगराध्यक्षांसमोर शहरातील वाहतूक सुरळीत करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.
परभणी–परळी राज्य महामार्गावरून गंगाखेड शहरात प्रवेश करताच महाराणा प्रताप चौकात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या चौकात हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असतानाही संबंधित हॉटेलधारकांनी वाहन पार्किंगची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. परिणामी,गोविंदराज हॉटेलसमोर वळण रस्त्यावर छोट्या-मोठ्या वाहनांची लांबच लांब रांग लागलेली असते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.ही समस्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते जावेद खान यांनी (दिनांक २९ डिसेंबर) रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.मात्र तक्रार देऊनही आठ दिवस उलटले तरी संबंधित वाहनधारक व हॉटेल मालकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही,असा आरोप होत आहे.
महाराणा प्रताप चौकातील सर्व हॉटेलधारकांना तसेच बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांनी समज देऊन शिस्त लावावी, अशी मागणी जावेद खान यांच्यासह शहरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
वेळीच योग्य उपाययोजना केल्या नाहीत,तर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तात्काळ वाहतूक कोंडी सुरळीत न केल्यास उपोषणाचा इशाराही सामाजिक कार्यकर्ते जावेद खान यांनी दिला आहे.







