

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.23जानेवारी):-अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ जीवती शाखेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन जिवती येथे करण्यात आले होते. शासकीय आदिवासी आश्रमशाळा पटांगणात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका सेवाधिकारी डॉ. अंकुश गोतावळे यांचे हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग सावंत महाराज होते. जिल्हा प्रचार प्रमुख सुरेश चौधरी, तालुका प्रचार प्रमुख आनंद कदम, शाखाध्यक्ष किसन गेडाम महाराज, नगर सेवाधिकारी शिवाजी नैताम, ज्येष्ठ प्रचारक बापुजी पिंपळकर, हुसेन किन्नाके महाराज, श्रीरंग उरकुडे, सुभाष पिंपळशेंडे, जनार्दन गेडाम, नारायण कणसे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित सर्व अतिथींनी समयोचित विचार व्यक्त करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार कार्य करण्याचा निर्धार केला.
दुसऱ्या सत्रात ह.भ.प. लक्ष्मीताई पारिसे (यवतमाळ) यांचा प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गावातील असंख्य लोक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला घटस्थापना, सामुदायिक ध्यान, रामधून दिंडी गावातून काढण्यात आली. नारपठार येथील विठ्ठल रूक्मिणी महिला भजन मंडळ,मुक्ताई महिला भजन मंडळ, श्रीगुरुदेव भजन मंडळ बीबी, शारदा महिला भजन मंडळ बीबी आदी भजन मंडळांनी आपली सेवा अर्पण केली. तसेच ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.







