

अमेरिका आणि इराण या देशांनी इराणवर केलेल्या हल्ल्याला बारा दिवस उलटले तरी हे युद्ध थांबायचे नाव घेत नाही. हे युद्ध जरी आखातात सुरू असले तरी त्याची झळ जगाला बसणार असे मी माझ्या ‘आखातातील युद्धाची जगाला झळ’ या लेखात लिहिले होते. या युद्धाची झळ जगाला जशी बसतेय तशीच भारतालाही बसत आहे आणि युद्धाच्या या धगीत देशातील सर्वसामान्य नागरिकांची ससेहोलपट होत आहे. या युद्धाची धग आता भारतीयांच्या स्वयंपाक घरांमध्येही बसू लागली आहे. इराण अमेरिका युद्धामुळे देशात गॅस तुटवडा निर्माण झाला असल्याने गॅस वितरक कंपन्यांच्या कार्यालयांपुढे नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
स्वयंपाकाचा गॅस ही जीवनावश्यक गरज आहे. जर हे युद्ध आणखी काही दिवस चालले तर स्वयंपाकाला गॅस मिळणार नाही अशी भीती सर्वसामान्य नागरिकांमध्ये पसरली झाली असल्याने जो तो गॅस मिळवण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी तासंतास रांगेत उभे राहून गॅस पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असले तरी टीव्ही वरील बातम्या पाहून सर्वसामान्यांच्या चिंतेत भरच पडत आहे. त्यात सरकारने गॅसच्या दरात ६० रुपये इतकी घसघशीत दरवाढ केल्याने भविष्यात गॅसचे दर आणखी वाढेल अशीही भीती निर्माण झाली आहे.
सरकारने घरगुती गॅसला प्राधान्य देण्यासाठी व्यावसायिक सिलेंडरचे बुकिंग थांबवले आणि एकंदर बुकिंगची मुदत २५ ते ३० दिवसांवर नेण्यात आली त्यामुळे नागरिकांच्या घबराटीत भरच पडली आणि सगळीकडून एकाच वेळी नोंदणीचे सत्र सुरू झाले. एकाच वेळी सगळीकडून नोंदणी होऊ लागल्याने नोंदणीत अडचणी येऊ लागल्या त्यामुळे नागरिक आणखी हवालदिल झाले. सर्वसामान्य नागरिक घरगुती गॅस मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत तर व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सरकारने बंद केला असल्याने हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेलला टाळे लावण्याची वेळ आली आहे.
हॉटेल बंद झाल्यास त्यावर उपजीविका करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरगुती गॅस प्रमाणेच सिनजी गॅसचाही तुटवडा जाणवू लागल्याने सीएनजी पंपावर रिक्षा आणि वाहनांच्या देशखील रांगा पहायला मिळत आहे. गॅस तुटवड्यामुळे काही कंपन्यांनी आपले कामकाज बंद केले आहे एकूणच या युद्धाने देशातील नागरिक हैराण झाले आहेत. अर्थात हे होणारच होते याची पूर्व कल्पना सर्वांनाच होती. अमेरिका आणि अमेरिकेचे मित्र राष्ट्र असलेल्या देशांचे नाक दाबण्यासाठी इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केली त्यामुळे त्यामार्गे भारतात येणारे इंधन पुरवठा थांबला.
देशाच्या गरजेपैकी ६० टक्के एलपीजी गॅस आपण आयात करतो आणि त्यातील ८० टक्के एलपीजी हा आखाती देशातून हॉर्मुझमार्गे भारतात येतो. तो मार्ग बंद झाल्याने देशातील ३० टक्के गॅस पुरवठा बाधित झाला आहे. हे होणार होते याची कल्पना सरकारलाही होती मात्र सरकारने राखीव साठा किंवा पुरेशी पर्यायी व्यवस्था न केल्याचेच हे परिणाम आहेत. हे युद्ध कधी थांबेल हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. हे युद्ध आणखी काही दिवस चालले तर यापेक्षा भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून सरकारने पर्यायी व्यवस्था आणि सुरळीत पुरवठा अशा दोन्ही आघाड्यांवर युद्धपातळीवर पावले उचलण्याची गरज आहे.
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)







