Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात दोन दिवसीय वाणिज्य महोत्सव उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात दोन दिवसीय वाणिज्य महोत्सव उत्साहात संपन्न

43

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.2एप्रिल):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या पदव्युत्तर वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र तर्फे आयोजित दोन दिवसीय वाणिज्य महोत्सवाचे आयोजन दि.२८ व २९ मार्च २०२६ रोजी करण्यात आले होते.

    सदर वाणिज्य महोत्सवाचे उदघाटन दिनांक २८ मार्च २०२६ रोजी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते प्रतापगड इमारतीवर कॉमर्स फेस्टिवलच्या 30 फुटी बोर्डचे अनावरण करून जल्लोषात  करण्यात आले.

    सदर महोत्सवाप्रसंगी आपल्या कृषीप्रधान देशाचे प्रतीक म्हणून व शेतकऱ्याला वंदना म्हणून या ठिकाणी बैलगाडी व ट्रॅक्टरचा प्रतिकात्मक पद्धतीने रॅलीमध्ये समावेश करण्यात आला होता. तसेच  यावेळी विद्यार्थी विविध महापुरुषांचे वेश घेऊन दिंडीमध्ये सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी बॉलीवूड थीम, हॉलीवुड थीम, रॅम्प वॉक मिस मॅच डे असे वेगवेगळे इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक २९ मार्च २०२६ रोजी वाणिज्य महोत्सवाचे उद्घाटन  अनुसयाबाई हॉलमध्ये करण्यात आले.

     सदर कार्यक्रमाप्रसंगी विचार मंचावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. के.एन. सोनवणे, समन्वयक डॉ. शैलेश वाघ, प्रभारी रजिस्ट्रार डी.एम. पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी. आर. देवरे, तसेच चोपड्यातील प्रसिद्ध व्यापारी  नितीन भाई मिलापचंद जैन, महेंद्र सोनार, फिरोज पठाण , जावेद भाई इत्यादी विचार मंचावर उपस्थित होते. तसेच यावेळी कार्यक्रमाप्रसंगी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. डी .एस. पाटील, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्हि. पी. हौसे, डॉ. एन. सी.पाटील, सौ.एच.सी. देवरे, पी.आय.जैन.,मिस. स्नेहा जैन इत्यादी उपस्थित होते.

     सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील व सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विभाग प्रमुख डॉ. सी.आर .देवरे यांनी वाणिज्य विभागाची आतापर्यंतची यशस्वी वाटचालीचा लेखाजोखा सादर केला. वाणिज्य महोत्सव साजरा करण्या मागील काय उद्देश आहे या संदर्भात देखील त्यांनी आपले मत व्यक्त केले.

     या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महेंद्र सोनार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘विद्यार्थ्यांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हायला पाहिजे. त्यासाठी उद्योजक बना व मोठ्या प्रमाणावर आपल्या महाविद्यालयाचे नाव प्रगतीपथावर घेऊन जा’असे सांगितले.

      नितीन भाई मिलापचंद जैन यांनी आपले विचार मांडत असताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात होणाऱ्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी झाले पाहिजे. त्यावरूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे प्रतिपादन केले.

     या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. शैलेश वाघ,श्री. डी.एम. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वाणिज्यच्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये मोठ्या संधी बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या नवीन कलागुणांना वाव द्यावा आणि नवीन टेक्नॉलॉजी चा अंगीकार करावा असे सांगितले.

       या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विभागाकडून मिस्टर. कॉमर्स आणि मिस. कॉमर्स व मिस्टर. फ्रेशर आणि मिस. फ्रेशर स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते मिस्टर कॉमर्स व मिस. कॉमर्स हा किताब बहाल करण्यात आला. त्यामध्ये मिस कॉमर्स म्हणून टी.वाय. बीकॉम वर्गातील कुमारी छाया साहेबराव चित्ते हिला तर मिस्टर कॉमर्स म्हणून टी.वाय.बीकॉम वर्गातील कुमार गौरव हिरालाल पवार याला हा किताब बहाल करण्यात आला. तसेच मिस. फ्रेशर म्हणून एफ. वाय. बी. कॉम वर्गातील कुमारी भारती कैलास बारेला हिला किताब देण्यात आला.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी केले. दुसऱ्या दिवशी देखील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रम सादर केले व अशा रीतीने वाणिज्य महोत्सवाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे आभार  चेतन बाविस्कर यांनी मानले.