Home नागपूर काही माणसं मार्ग बदलतात; तर काही मार्ग माणसं बदलतात!

काही माणसं मार्ग बदलतात; तर काही मार्ग माणसं बदलतात!

29

माणसाचं आयुष्य म्हणजे सरळ रेषेतली वाट नसते. ती वळणांनी, चढ-उतारांनी, काटेरी वळचणींनी भरलेली असते. कुणी त्या वाटेवर चालताना स्वतःचा मार्ग बदलतो; तर कुणाचं संपूर्ण व्यक्तिमत्त्वच त्या मार्गामुळे बदलून जातं. म्हणूनच जीवनाचं एक कटू पण खरं सत्य असं सांगतं, काही माणसं मार्ग बदलतात; तर काही मार्ग माणसं बदलतात. हा फरक समजून घेतला, तर माणसाचं आयुष्यही समजायला लागतं. काही माणसं परिस्थितीवर मात करतात. संकट आलं, अडथळे आले, अपयश आलं तरी ते थांबत नाहीत. ते विचार करतात, आत्मपरीक्षण करतात आणि म्हणतात, हा मार्ग माझ्यासाठी योग्य नाही; मला दुसरी वाट शोधायची आहे. ही माणसं पळपुटी नसतात; ती प्रगल्भ असतात. कारण मार्ग बदलणं म्हणजे हार मानणं नव्हे, तर स्वतःला वाचवणं असतं. स्वतःच्या मूल्यांशी, स्वप्नांशी आणि अंतःकरणाशी प्रामाणिक राहण्यासाठी घेतलेला तो एक धाडसी निर्णय असतो.

         इतिहासात अशी असंख्य उदाहरणं आहेत. अपयशातून उभे राहिलेले उद्योजक, अन्यायाला कंटाळून व्यवस्थेविरुद्ध उभे ठाकलेले समाजसुधारक, चुकीच्या वाटेवरून परत फिरलेले सामान्य माणूस या सगळ्यांनी मार्ग बदलला; पण स्वतःला हरवू दिलं नाही. पण प्रत्येकाला मार्ग बदलता येतोच असं नाही. सगळ्यांकडे पर्याय नसतात. सगळ्यांकडे बळ नसतं. सगळ्यांकडे पाठिंबा नसतो. मग काही माणसं मार्ग बदलत नाहीत; मार्गच त्यांना बदलून टाकतो. दारिद्र्य, बेरोजगारी, सामाजिक अन्याय, कौटुंबिक जबाबदाऱ्या, व्यसन, सत्ता, पैसा हे सगळे मार्ग माणसाच्या आयुष्यावर आपला ठसा उमटवतात. एक संवेदनशील माणूस हळूहळू कठोर होतो. एक प्रामाणिक माणूस तडजोडी शिकतो. एक आदर्शवादी माणूस वास्तववादी बनतो, कधी कधी तर निराशावादीही. हा बदल नेहमी स्वेच्छेने होत नाही; तो अनेकदा परिस्थितीने लादलेला असतो. मार्ग माणसाला कधी मोडतो, तर कधी घडवतो. प्रत्येक मार्ग वाईट नसतो. काही मार्ग माणसाला मजबूत करतात.

         संघर्षाची वाट चाललेला माणूस सहनशील होतो. अपमान सहन केलेला माणूस संवेदनशील होतो. कठीण परिस्थितीत तग धरलेला माणूस नेतृत्व शिकतो पण काही मार्ग माणसाला आतून तोडतात. निरंतर अपमान, अन्याय, उपेक्षा, असुरक्षितता यामुळे माणूस स्वतःवरच विश्वास ठेवणं सोडतो. मग तो जगण्यासाठी बदलतो; पण तो बदल त्याचा नसतो, तर तो लादलेला असतो. आजचा समाज कोणते मार्ग तयार करतोय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आजचा समाज माणसाला कोणत्या वाटेवर ढकलतो आहे? स्पर्धेची वाट, जिथे माणूस माणसाचा प्रतिस्पर्धी आहे. स्वार्थाची वाट, जिथे “मी” केंद्रस्थानी आहे. दिखाव्याची वाट, जिथे सत्यापेक्षा प्रतिमा महत्त्वाची आहे. तडजोडीची वाट, जिथे मूल्यांपेक्षा सोयी जड ठरतात. या वाटांवर चालताना अनेक माणसं नकळत बदलून जातात. ते स्वतःला ओळखू शकत नाहीत. आरशात दिसणारा चेहरा त्यांचाच असतो; पण आतला माणूस कुठेतरी मागे पडलेला असतो. 

         मार्ग बदलणं ही ताकद आहे, कमकुवतपणा नाही. समाज अनेकदा मार्ग बदलणाऱ्याला दोष देतो. “स्थिर नाही,” “कायम बदलतो,” “टिकाव नाही” अशी लेबले लावली जातात पण सत्य असं आहे की चुकीच्या मार्गावर ठाम राहणं हे धैर्य नाही; ते हट्ट आहे. वेळीच वळण न घेणं म्हणजे अपघाताला आमंत्रण देणं. मार्ग बदलणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणं. ते धाडस सगळ्यांकडे नसतं. शेवटी प्रश्न मार्गाचा नाही, माणसाचा आहे. मार्ग बदलणं की मार्गाने बदलणं हा शेवटी निवडीचा प्रश्न आहे. माणूस जागरूक असेल, आत्मभान जपेल, प्रश्न विचारेल, तर तो मार्ग बदलू शकतो. पण जर तो गप्प राहिला, सवयींचा गुलाम झाला, तर मार्ग त्याला बदलतो कधी नकळत, कधी निर्दयपणे. म्हणूनच प्रत्येक वळणावर थांबून स्वतःला विचारणं गरजेचं आहे. हा मार्ग मला घडवतोय की मोडतोय? मी बदलतोय कारण मला वाढायचं आहे, की कारण मला तग धरायचा आहे?

         आयुष्याच्या वाटेवर चालताना सगळ्यांनाच वळणं येतात. कोणी त्या वळणावर दिशा बदलतो, तर कोणी तिथेच स्वतः बदलून जातो. पण ज्यांनी स्वतःची ओळख जपली, मूल्यांना धरून ठेवलं आणि गरज पडल्यावर मार्ग बदलण्याचं धैर्य केलं, तेच खऱ्या अर्थाने जिंकतात. कारण शेवटी एवढंच खरं आहे की, मार्ग सगळ्यांनाच बदलतो; पण स्वतःला हरवू न देता मार्ग बदलणं, हीच खरी माणूसपणाची कसोटी आहे.

✒️प्रवीण बागडे(नागपूर)मो:-९९२३६२०९१९