Home चंद्रपूर हरिद्वार येथे राजुऱ्याचा गौरव : इन्फंट चे क्रीडा शिक्षक हर्षल क्षीरसागर यांना...

हरिद्वार येथे राजुऱ्याचा गौरव : इन्फंट चे क्रीडा शिक्षक हर्षल क्षीरसागर यांना ‘द्रोणा रत्न बेस्ट टीचर’ तर विद्यार्थ्यांनाही ‘बेस्ट प्लेयर द्रोणा रत्न’ सन्मान

49

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.18मे):– हरिद्वार येथे दि. १६ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित द्रोणा रत्न पुरस्कार सोहळ्यात राजुऱ्यातील इन्फंट जीझस कॉन्व्हेंट शाळेने उल्लेखनीय यश संपादन करत आपला ठसा उमटविला. शाळेचे क्रीडा शिक्षक हर्षल सुभाष क्षीरसागर यांना उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘द्रोणा रत्न बेस्ट टीचर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

याच सोहळ्यात इन्फंट जीझस कॉन्व्हेंट, राजुरा येथील विद्यार्थी अथर्व चरणदास देवाडकर आणि सोहम सागर हिवरे यांना त्यांच्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीबद्दल ‘बेस्ट प्लेयर द्रोणा रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या यशामुळे राजुरा शहरासह संपूर्ण शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

        विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण क्रीडा प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे क्रीडा शिक्षक हर्षल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर त्यांचा सन्मान करण्यात आल्याने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. क्रीडा शिक्षक व विद्यार्थी यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, संस्थेचे सचिव तथा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग तसेच विधार्थी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.