Home महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला!

शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला!

27

▪️गंगाखेड तालुका कृषी कार्यालयाला टाळे ठोकून संतप्त आंदोलन

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.25मे):-येथील तालुका कृषी कार्यालयाच्या बेजबाबदार, कामचुकार व संशयास्पद कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. वारंवार निवेदन देऊनही शेतकऱ्यांच्या पीक कापणी प्रयोगाचे अहवाल मिळत नसल्याने, तसेच आंदोलनाच्या दिवशीही कार्यालयात ना अधिकारी, ना कर्मचारी उपस्थित असल्याने अखेर संतप्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला टाळा ठोकून आंदोलन केले.

आंदोलनादरम्यान आंदोलकांनी कार्यालयातील पंखे, दिवे, संगणक आदींचा विद्युत पुरवठा बंद करून कार्यालय कुलूपबंद केले. कृषी विभागातील गलथान कारभाराचे वाभाडे काढताना शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले. अनुदान, सर्वेक्षण व माहिती मिळवण्यासाठीही लाच मागितली जाते, असा थेट आरोप करण्यात आला. मात्र, या सगळ्यांकडे जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष सुरू असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, शेतकऱ्यांचे जोडधंदे, पशुपालन व फळबागायत या क्षेत्रांतील अडचणी दिवसेंदिवस वाढत असून, कृषी कार्यालयातील हायगाई, कामचुकारपणा व ढिसाळपणा यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडत आहेत. “कृषी खाते भ्रष्टाचाराने लिप्त असून ठराविक लोकांसाठी पांढरे उखळ, तर सामान्य शेतकऱ्यांसाठी सरकारी दरबारी पांढरा हत्ती ठरत आहे,” अशी तीव्र टीका आंदोलकांनी केली.

“कृषी विभाग शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नसेल, तर अशा कृषी कार्यालयांना टाळे ठोकणेच योग्य,” असा ठाम इशारा देत आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड योगेश सरकार यांनी केले.

यावेळी सुदर्शन दराडे, संदीप फड, सचिन मुंढे, ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.