Home अमरावती “शोषणाविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे महात्मा फुलेंचा गुलामगिरी हा ग्रंथ”

“शोषणाविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे महात्मा फुलेंचा गुलामगिरी हा ग्रंथ”

93

गुलामगिरी विरोधी हा दिन ।

फुलेंचे तत्त्व सत्यधर्म खाण ॥

हाच मुक्तिचा सन्मानाचा बाण ।

वृद्धिंगत केला बहुजनांचा मान ॥

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन ॥क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार करून दि.१ जून २०२६ ला असलेला १५४ वा गुलामगिरी विरोधी दिन साजरा करू या ॥

महात्मा जोतीराव फुले यांचा ‘गुलामगिरी’ हा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ग्रंथ दि.१ जून १८७३ रोजी प्रकाशित झाला,म्हणून १ जून हा दिवस ” गुलामगिरी विरोधी दिन ” म्हणून साजरा करण्यात येतो.

महात्मा फुलेंनी हा ग्रंथ अमेरिकेतील ज्या कृष्णवर्णीय (ब्लॅक) लोकांनी गुलामगिरीविरुद्ध लढा दिला आणि ज्यांनी गुलामगिरी नष्ट केली,त्यांना आदरांजली म्हणून समर्पित केलेला आहे. अमेरिकेप्रमाणेच भारतातील शूद्र-अतिशूद्रांनाही या सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची गरज आहे, हा यामागील उद्देश होता.

गुलामगिरी हा ग्रंथ ‘धोंडीराव’ व ‘जोतीराव’ यांच्यातील संवाद स्वरूपात लिहिलेला आहे.शूद्र आणि अतिशूद्रांची सामाजिक,धार्मिक मानसिकतेतून आणि गुलामगिरीतून मुक्तता करणे, हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश होता.

महात्मा जोतीराव फुले लिखित ‘गुलामगिरी’ हा केवळ एक ग्रंथ नाही,तर तो भारतीय समाजव्यवस्थेतील विषमतेवर आणि शोषणावर आधारित एक वैचारिक क्रांती आहे. महाराष्ट्रातील आणि एकंदरीत भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात या ग्रंथाचे स्थान अनन्यसाधारण आहे.

​महात्मा फुलेंनी हा ग्रंथ शूद्र आणि अतिशूद्रांना बहुजन समाजाला त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यातून त्यांची मुक्तता करण्यासाठी लिहिलेला आहे. तत्कालीन समाजात धर्माच्या आणि देवाच्या नावाखाली बहुजनांचे जे मानसिक आणि आर्थिक शोषण सुरू होते, त्याविरुद्धची महात्मा फुलेंची ही वैचारिक लढाई होती .

​”विद्येविना मती गेली | मतीविना नीती गेली |

नीतीविना गती गेली | गतीविना वित्त गेले |

वित्त विना शुद्र खचले ।

इतके अनर्थ एका अविद्येने केले !!”

या बहुजनांच्या जीवन उज्ज्वल करणाऱ्या सूत्राची मांडणी महात्मा फुलेंनी याच काळात केली होती आणि हे सूत्र या ग्रंथासाठी प्रेरक ठरले .

​’गुलामगिरी’ या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची ‘धोंडीराव आणि जोतीराव’ यांच्यातील संवादरूपी मांडणी होय.​धोंडीराव हा तत्कालीन सर्वसामान्य, शंकाकुशंका घेणाऱ्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो,तर ​जोतीराव हे अत्यंत तार्किक,परखड आणि ऐतिहासिक पुराव्यांचा आधार घेत शंकांचे निरसन अतिशय परखडपणे करतात.त्यांचा संवाद प्रासादिक भाषेत असल्यामुळे त्यातील तत्त्वज्ञानही सर्वसामान्य वाचकाला सहज समजते.

गुलामगिरी’ हा क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी लिहिलेला एक अत्यंत क्रांतिकारी आणि मार्गदर्शक ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन समाजातील जातीयता,अंधश्रद्धा आणि उच्चवर्णीयांच्या मानसिक व धार्मिक गुलामगिरीवर कडक प्रहार केलेले आहेत.​महात्मा फुले यांनी या ग्रंथात स्पष्ट केले आहे की,शूद्र आणि अतिशूद्र हे शारीरिक गुलामगिरीपेक्षा मानसिक आणि धार्मिक गुलामगिरीचे जास्त बळी ठरले आहेत.

उच्चवर्णीयांनी धर्माच्या आणि देवाच्या नावाखाली रचलेल्या खोट्या कथांमुळे बहुजन समाज स्वतःला कनिष्ठ समजू लागला. या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडणे सर्वात महत्त्वाचे आहे, हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे.​शिक्षण नसल्यामुळे बहुजन समाजाचे कसे आर्थिक,सामाजिक आणि बौद्धिक नुकसान झाले,याचे अत्यंत अचूक वर्णन त्यांनी या ग्रंथांत केले आहे,तसेच या ग्रंथात पुराणातील कथांचे तर्कशुद्ध खंडन त्यांनी केले आहे.त्यांनी विष्णूच्या दशावतारांच्या कथांचे तार्किक विश्लेषण करून त्यांचे खंडन केले आहे. त्यांनी मांडले की, हे अवतार म्हणजे प्रत्यक्षात या देशातील मूळ रहिवाशांना (ज्यांना त्यांनी ‘क्षत्रीय’ किंवा ‘शूद्र’ म्हटले) गुलाम बनविण्यासाठी आर्य आक्रमकांनी केलेल्या मोहिमा होत्या.

उदा.वामनाने राजा बळीचा केलेला पराभव हा एका कपटाचा भाग होता,असे सांगून त्यांनी राजा बळीला बहुजनांचा राजा आणि लोककल्याणकारी नायक म्हणून सादर केले आहे,तसेच​ भट-भिक्षुकांनी सामान्य जनतेला विधी,पूजापाठ आणि विनाकारणच्या कर्मकांडांमध्ये अडकवून त्यांचे आर्थिक शोषण कसे केले आहे,याचे जिवंत चित्रण या ग्रंथात आहे.महात्मा फुले यांचा ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ केवळ एका अन्यायाविरुद्धचा आवाज नाही,तर तो बहुजन समाजाला आत्मसन्मान,शिक्षण आणि विवेकवादाची वाट दाखवणारा एक जाहिरनामा आहे. समाजातील समता आणि न्यायाची स्थापना करण्यासाठी हा ग्रंथ आजही तितकाच महत्त्वपूर्ण मानला जातो.क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा १५४ व्या गुलामगिरी विरोधी दिनी संकल्प करू या॥

गुलामगिरीत । समता विचार ।

फुलेंचे विचार । क्रांतिकारी ॥

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९