Home महाराष्ट्र जागतिक पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिन

54

आज ५ जून, आजचा दिवस जगभरात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. मागील दोन अडीच शतकात विशेषतः औद्योगिक क्रांती नंतर जागतिक हवामान बदल आणि इतर नुकसानकारक बदल लक्षात घेता पृथ्वीचे आयुर्मान, सहज, स्वाभाविक आणि निसर्गनियमानुसार असावे या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघात ( युनो ) ५ ते १५ जून १९७२ दरम्यान एक संमेलन झाले. यात संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यावर सखोल चर्चा केली. त्यात मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचे होत असलेले नुकसान आणि त्याचा मानवी जीवनावर होणारे विपरीत परिणाम यावर सखोल चर्चा होऊन काहीतरी गंभीर पावले उचलली पाहिजे यावर एकमत झाले.

याच संमेलनात संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम United Nations Environment Program ( UNEP ) चा जन्म होऊन दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले, यामुळे लोक, सरकार आणि समाजात पर्यावरण विषयक जनजागृती करता येईल. याच संमेलनात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पर्यावरणाची बिघडती जागतिक परिस्थिती आणि त्याचा जगाच्या भविष्यावर होणारा प्रभाव या विषयावर प्रभावी भाषण दिले आणि समतोल पर्यावरणाचे महत्व विशद केले. आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक स्तरावर हे भारत सरकारचे पहिले महत्वाचे पाऊल होते. पुढील वर्षी म्हणजे १९७३ मध्ये धरती हा विषय घेऊन मोजक्या संकल्पनेसहित हा दिवस साजरा करण्यात आला.

१९७४ मध्ये जगातील विविध शहरात हा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा करणे सुरू झाले आणि तिथून पुढे संपूर्ण जगभर दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण आत्मीयतेने साजरा केला जातो. दरवर्षी सुमारे १५० देश हा दिवस साजरा करतात आणि दरवर्षी वेगळा देश हा उपक्रम जागतिक स्तरावर आयोजित करतो. जागतिक परिस्थिती, अन्न, पाणी, दुष्काळ, तापमान वाढ, हवामान बदल आणि त्याचे विपरीत परिणाम, मानवी जीवन आणि भविष्य, या सर्वांवर जनजागृती म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्यासाठी दरवर्षी एक नवी थीम निवडून त्यासंदर्भात कार्य केले जाते. त्यासाठी मग विविध देशानी पर्यावरण संबंधित पशु, पक्षी, प्राणी आणि जंगल संवर्धन करण्यासाठी वेगवेगळे कायदे केले. २०२० साली कोलंबियाने या दिवसाचे आयोजन केले होते. २०२१ साली पाकिस्तान या जीवन परिवर्तन उपक्रमाचे यजमान होते . २०२२ साली स्वीडन हा देश या दिवसाचा आयोजक होता.

फक्त आणि फक्त पृथ्वी ही त्या वर्षीची थीम होती. २०२३ साली आयव्हरी कोस्ट हा देश या दिवसाचा आयोजक होता. प्लास्टिक प्रदूषणावर उपाय ही त्या वर्षीची थीम होती. त्या दिवशी विविध देशांमध्ये अंतर्गत परिस्थितीत पर्यावरणविषयी होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली गेली. २०२० आणि २०२१ साली जगावर कोरोना महामारीचे संकट असल्याने हा कार्यक्रम सार्वजनिकरित्या साजरा न करता ऑनलाइन साजरा केला गेला. २०२४ साली आपली जमीन आपले भविष्य : जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण रोखणे आणि दुष्काळ प्रतिरोधकता या थीम खाली साजरा केला गेला. या थीमचा उद्देश जमीन पुनर्संचयित करणे वाळवंटीकरण रोखणे आणि दुष्काळाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी सक्षम राहणे हा होता.

२०२४ साली सौदी अरेबिया हा जागतिक पर्यावरण दिनाचा आयोजक होता. मागील वर्षी म्हणजे २०२५ साली दक्षिण कोरिया जागतिक पर्यावरण दिनाचा आयोजक होता. प्लास्टिक प्रदूषण थांबवा ही त्या वर्षीची थीम होती. या थीमचा संदेश होता की प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जागतिक स्तरावर एकत्र येऊन काम करणे. UNEP नुसार पप्लास्टिक प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे, जी पर्यावरणास आणि मानवी आरोग्यास धोकादायक आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जगभर प्लास्टिक प्रदूषण आणि त्याचे दुष्परिणाम याबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.

जगभरातील लोकांनी या दिवशी पर्यावरणाचे जतन करुन मानवी भविष्य सुरक्षित करण्याचा संकल्प केला आणि प्लास्टिक मुक्तीचा ध्यास घेतला. यावर्षीच्या म्हणजे २०२६ च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे, हवामान बदल आणि त्यावर त्वरित कृती. या थीमचा मुख्य उद्देश वाढत्या तापमानाला रोखणे, हरित ऊर्जेचा वापर वाढवणे आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांना एकत्र आणणे हा आहे. अझरबैजान हा देश या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाचा यजमान देश आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५