Home महाराष्ट्र मुक्या समाजाचा बुलंद आवाज- ‘मूकनायक’

मुक्या समाजाचा बुलंद आवाज- ‘मूकनायक’

120

हजारो वर्षांपासून इथला शूद्र, अतिशूद्र म्हणून ओळखला जाणारा समाज एक मुके जनावर सारखा जगत होता . त्याचे हंबरणे जणू त्याच्या गोठ्यापुरते सीमित होते. भारतात इंग्रज आले , त्यांनी इंग्रजी शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी या शाळा या मुक्या समाजापर्यंत नेल्या आणि या समाजाची दुःख , हाल अपेष्टा, त्यांच्या भाव भावना मांडण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्यावेळच्या महार समाजातील एक लढाऊ व्यक्तिमत्व असलेले गोपाळ बाबा वलंगकर यांनी त्यावेळच्या दीनमित्र, दीनबंधू , सुधारक अश्या वृत्तपत्रांतून मुक्या समाजाच्या व्यथा , अन्याय , अत्याचार मांडल्या. त्यांनी १९८८ मध्ये ‘ विटाळ विध्वंसक ‘ नावाचे पुस्तक लिहून धर्माच्या ठेकेदारांना एकूण २६ प्रश्न विचारून नवे वादळ निर्माण केले.

         गोपाळ बाबा वलंगकर यांच्या या प्रयत्नांनी प्रेरित होउन किसन फागोजी बनसोड यांनी ‘ निराश्रित हिंद नागरिक ‘ साप्ताहिक सुरू केले . शिवराम जानबा कांबळे यांनी १९०८ मध्ये ‘ सोमवंशीय मित्र ‘ हे साप्ताहिक सुरू केले. किसन फागोजी बनसोड यांनी १९१८ ला ‘ मजूर पत्रिका’ नावाचे दुसरे साप्ताहिक सुरू केले. या महार समाजातील नेत्यांनी आपले स्वतंत्र वृत्तपत्रं सुरू करून या देशातील गुलामगिरीची लक्तरे वेशीवर टांगली . धर्माला प्रश्न विचारण्याचे , समाजाचे प्रश्न मांडण्याचे, माणूस म्हणून जगण्याचे हक्क मागणारे , स्त्रियांचे शोषण सांगणारे लिखाण वरील नियतकालिकातून जसे उमटत होते तसेच तेंव्हाच्या जागरूक , डेक्कन रयत, विजयी मराठा , ज्ञानप्रकाश, सुबोध पत्रिका व अन्य काही नियतकालिकातून सुद्धा उमटू लागले होते. खास करून अस्पृश्य समाजाने सुरू केलेली नियतकालिके अल्पायुषी ठरत गेली. वलंगकर , कांबळे, बनसोड हे त्या काळातील अस्पृश्य समाजाचे नामांकित पुढारी म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते . 

      पुढं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे शिक्षण सुरू असतानाच अस्पृश्य समाजाचे स्वतंत्र मुखपत्र असण्याबाबत प्रयत्न केले. या दरम्यान ते सिडनेहॅम येथे प्राध्यापक म्हणून सेवारत होते. आपल्या समाजाचे मुखपत्र आपणच चालविण्या करिता त्यांना तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. या करिता त्यांनी संपादक म्हणून अन्य व्यक्तीवर जबाबदारी देऊन तांत्रिक बाबी दूर केल्या व ३१ जानेवारी १९२० रोजी मुक्या समाजाचा बुलंद आवाज ठरणाऱ्या ‘मूकनायक’ या पाक्षिकाची सुरवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपादकीय लेखन लिहून देत असत. संपादक म्हणून त्यांनी पांडुरंग नंदराम भटकर या पदवीधर असलेल्या व सामाजिक, पुरोगामी चळवळीत अतिशय प्रभावी काम करीत असलेल्या व्यक्तीची निवड केली. पांडुरंग भटकर हे त्याकाळी बरेच नावाजलेले होते. त्यांनी ब्राम्हण मुली सोबत लग्न केले असल्याने अधिकच नावाजले होते. त्यांना लिखाणाची आवड असल्याने त्यांनी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. ज्ञानेश्वर घोलप हे व्यवस्थापक होते. भटकर यांच्या नंतर हेच घोलप संपादक झाले. 

            मूकनायक सुरू करताना बाबासाहेब म्हणाले की, ” कोणतीही चळवळ यशस्वी करावयाची असेल तर त्या चळवळीचे स्वतंत्र वर्तमानपत्र असणे आवश्यक असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते त्या चळवळीची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे असते “.

       ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायकचा जन्म झाला अर्थात पहिला अंक प्रसिद्ध झाला. १९२० मध्ये सुद्धा आज सारखाच फसवा, खोटा राष्ट्रवाद फोफावला होता. आम्हीच फक्त देशभक्त आहोत, आम्हालाच राष्ट्रवाद माहीत आहे अश्या तोऱ्यात काही मंडळी वावरत होती, आपल्याच देशातील दुसऱ्या समाजाचा जास्तीत जास्त द्वेष करणे म्हणजे जास्तीत जास्त देशभक्त ठरविणे ही संकल्पना त्यांनी मांडली. अश्या बाजार बुणग्या लोकांना मोठी प्रसिध्दी सुद्धा मिळत होती. मात्र खरा राष्ट्रवाद काय असतो या विषईचे प्रतिबिंब मूकनायक मध्ये आपणास वाचावयास मिळते. या अंकात स्पष्टपणे लिहिले की, ‘जसे एक माणूस म्हणजे एक कुटुंब किंवा एकच घर म्हणजे समाज किंवा गाव , प्रांत , देश होऊ शकत नाही, तद्वत एकाच राष्ट्रातील एकच विवक्षित जात अगर समाज किंवा गाव एक राष्ट्र होऊ शकत नाही. तर एका पेक्षा अधिक माणसे मिळून एक कुटुंब, अनेक कुटुंबे मिळून एक समाज, अनेक समाज मिळून एक गाव,अनेक गावं मिळून एक प्रांत व अनेक प्रांत मिळून एक राष्ट्र होत असते. एकाच कुटुंबातील माणसांमध्ये एकमेकांविषयी जशी आपलेपणाची भावना असते तशीच ती प्रत्येक समाजात असल्या शिवाय राष्ट्राचा जिवंतपणा दिसणे शक्य नाही. आणि ज्या ठिकाणी असा जिवंतपणा असणार नाही त्या ठिकाणी इतरांच्या चढाओढीत अपयश हे असणारच.

      एक राष्ट्र म्हणजे एक कुटुंब अशी शिकवण या देशाला सर्वप्रथम याच मूकनायक ने दिली आहे. मूकनायक तसा निव्वळ एका जातीचा, व्यक्तीचा वा चळवळीचा राहिला नाही. इतर वृत्तपत्रात अस्पृश्य समाजाच्या प्रश्नांना जागा मिळाली नसेल पण अस्पृश्य समाजाच्या या मूकनायकाने सर्व देशाचे प्रश्न ऐरणीवर मांडले आहेत. माणसाचे माणूसपण ( मग तो अस्पृश्य असो वा अन्य ) काय असते, त्याचे हक्क काय असतात याची शिकवण या मूकनायकने दिली आहे. मुक्या समाजाचे मुक पत्र न राहता वाचाळविरांचे मुख बंद करणारे मुखपत्र राहिले.

       या अंकास राजर्षी शाहू महाराज यांनी ₹ २५०० ची मदत केली आहे . निधी अभावी या मूकनायक चे केवळ १४ च अंक निघाले आहेत मात्र वृत्तपत्रं कसे निस्पृह असावे याची शिकवण तो देऊन गेला आहे, वृत्तपत्राच्या इतिहासात आपला ठसा उमटवून गेला आहे.    

✒️लेखक:-जयसिंग वाघ(अजिंठा हाउसिंग सोसायटी,अजिंठा चौक,जळगाव)मो:-९८८१९२८८८१