

सेवासामर्थ्य बहुउद्देशीय संस्था अंतर्गत युगप्रभात फाउंडेशन, अमरावती व्दारा आयोजित ग्रामजयंती पर्वानिमित्त विश्वशांती करिता दि.३० मे २०२६ सायंकाळी ६.३० वाजता पंचवटी चौक, अमरावती येथील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मारकाजवळ सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन केलेले आहे.
या सामुदायिक प्रार्थनेमध्ये अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मस्थान समिती यावली शहीद, श्रीसमर्थ आडकोजी महाराज संस्थान वरखेड, श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती, रामचंद्र युवक कल्याण संस्था, मोझरी, श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुल, गुरुकुंज मोझरी, राष्ट्रधर्म प्रचार समिती व राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी, श्री गुरुदेव समन्वय समिती, अमरावती, ग्रामगीता आचारपीठ तत्वज्ञान चारिटेबल ट्रस्ट, अमरावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ, गुरुकुंज, जाणीव प्रतिष्ठान अमरावती, शाश्वत कन्सेप्ट स्कूल अमरावती, समर्पन प्रतिष्ठान, सांझाग्राम मालधूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच तिवसा, सप्तखंजेरी प्रबोधनकार संघ, महाराष्ट्र राज्य, मराठा सेवा संघ, अमरावती, रा. तु. म. विचारधारा समिती, अमरावती, रा. तु. म. ग्रामजयंती उत्सव समिती गुरुकुंज, श्री गुरुदेव सेवा मंडळ राधानगर अमरावती, श्री गुरुदेव सेवा मंडळ अर्जुन नगर, श्रीगुरुदेव सेवा मंडळ सहभागी आहेत अशा सर्व सहभागी मंडळांचे हार्दिक अभिनंदन ॥
ग्रामजयंती पर्वानिमित्त आयोजित या सामुदायिक प्रार्थनेच्या निमित्ताने हा लेखप्रपंच.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ‘ग्रामगीता’ या ग्रंथातून आणि आपल्या विचारांतून ‘सामुदायिक प्रार्थनेला’ अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यांच्या मते,प्रार्थना ही केवळ मंदिरात बसून एकांतात करण्याची गोष्ट नसून, समाजाने एकत्र येऊन करायची एक सामूहिक शक्ती आहे.
तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व सांगितलेले आहे. सामाजिक ऐक्य आणि समता
सामुदायिक प्रार्थनेत आहे. गावातील सर्व जाती, धर्म, पंथ आणि सर्व थरातील लोक एकत्र येतात. महाराजांचे मत होते की, जेव्हा लोक एकत्र बसून प्रार्थना करतात, तेव्हा त्यांच्यातील उच्च-नीच भाव, जात-पात आणि हेवेदावे नष्ट होतात. यामुळे समाजात ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि समतेची भावना निर्माण होते व सामूहिक शक्तीचा अर्थात संघशक्तीचा उदय होतो .”एकतेची शक्ती मोठी, जेणे कार्ये होती अटीतटी”
एकट्या माणसाच्या प्रार्थनेपेक्षा जेव्हा संपूर्ण गाव एकत्र येऊन एका सुरात प्रार्थना करतो तेव्हा एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या संघशक्तीचा उपयोग गावाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी करता येतो, असे राष्ट्रसंतांचे तत्त्वज्ञान होते. सामुदायिक प्रार्थनेमुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच एक विशिष्ट वेळ पाळण्याची आणि शिस्तीत राहण्याची सवय लागते. सामुदायिक प्रार्थनेमध्ये म्हटले जाणारे विचार आणि भजने माणसावर नकळत चांगले संस्कार करतात, ज्यामुळे समाजातील गुन्हेगारी आणि वाईट प्रवृत्तींना आळा बसतो.
सामुदायिक प्रार्थनेच्या वेळी
जेव्हा सर्व लोक एकत्र येऊन नतमस्तक होतात, तेव्हा माणसाचा ‘मी’पणा अर्थात अहंकार गळून पडतो. श्रीमंत-गरीब,सुशिक्षित-अशिक्षित सर्व एकाच पातळीवर येतात, त्यामुळे परस्परांविषयी असलेला आदर वृद्धिंगत होतो.
सामुदायिक प्रार्थनेमुळे ग्रामनाथांमध्ये ग्रामविकासाची प्रेरणा निर्माण होते.
राष्ट्रसंतांची सामूहिक प्रार्थना फक्त आध्यात्मिक नव्हती, तर ती कर्मयोगाशी जोडलेली होती. प्रार्थनेच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र आल्यावर, प्रार्थनेनंतर गावातील स्वच्छता,आरोग्य, शिक्षण आणि इतर समस्यांवर चर्चा होऊन त्यावर उपाय सुचविले जातात तशाप्रकारे ग्रामनाथ करतात त्यामुळे
ग्रामाची सुधारणा होऊन एका आदर्श गावाची निर्मिती होते अर्थात ही सामुदायिक प्रार्थना ग्रामविकासाचे केंद्र बनते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रार्थनेतून सर्वांनाच जागृत करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.त्यांनी लिहिलेली “या झोपडीत माझ्या…” अथवा “हर देश में तू, हर भेष में तू…” ही भजने मानवी मूल्यांची आणि वैश्विक एकात्मतेची शिकवण देतात.
राष्ट्रसंतांच्या सामुदायिक प्रार्थनेचा मुख्य उद्देश
”मज लाभो सदा संगती सज्जनांची,
जगती घडो सेवा मानवाची ॥ ” हा आहे .
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या दृष्टीने सामुदायिक प्रार्थना ही समाज जोडण्याचा,माणसाला माणूस बनवण्याचा आणि राष्ट्र उभारणीचा एक महामार्ग आहे. आजच्या काळातही समाजातील दुरावा कमी करण्यासाठी त्यांची ही शिकवण अतिशय महत्त्वाची आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजसुधारणेचे कार्य फार मोठ्या प्रमाणात केले. समाजातील अनिष्ट रूढी- परंपरांवर प्रहार केला. जातीभेद,अस्पृश्यता आणि कर्मकांडांविरुद्ध आवाज उठविला.त्यांनी कोणत्याही एका विशिष्ट जातीचा,पंथाचा धर्म न सांगता ‘मानवता धर्म’ आणि ‘विश्वधर्म’ सांगितला.त्यांच्या मते, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे आणि समाजाची सेवा करणे हाच खरा धर्म आहे .असल्याचे त्यांनी आयुष्यभर आपल्या कीर्तनांतून, भजनातून आणि लेखनातून पटवून दिले.राष्ट्रसंतांनी सर्व धर्मीयांना एकत्र आणण्यासाठी ‘सामुदायिक प्रार्थना’ सुरू केली. त्यांच्यामते, “ग्रामसेवा हीच खरी देशसेवा आहे. गाव स्वच्छ ठेवणे,व्यसनांपासून दूर राहणे आणि गावाला स्वावलंबी बनविणे हा प्रत्येक नागरिकाचा
धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सामूहिक प्रार्थना आणि सहभोजन करावे.
तुकडोजी महाराजांनी ‘सामूहिक प्रार्थना’ हे गावाच्या एकतेचे साधन मानले.जेव्हा गावातील सर्व लोक एकत्र येऊन प्रार्थना करतात, तेव्हा त्यांच्यातील भेदाभेद मिटतात आणि संघटनशक्ती वाढते.एक विचाराने चालणारे गाव हेच ‘सुखी गाव’ होऊ शकते.
तुकडोजी महाराजांचे तत्त्वज्ञान सांगते की, “गाव सुधरेल तरच देश सुधरेल.” ग्रामनाथांनी केवळ स्वतःचा स्वार्थ न पाहता ‘सर्वांगीण ग्रामविकास’ हेच आपले जीवनध्येय मानावे, हाच ग्रामगीतेचा मूळ संदेश आहे.
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाची स्थापना गुरुकुंज मोझरी,जि.अमरावती येथे त्यांनी केली,ज्याद्वारे आजही सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन तसेच सामाजिक आणि शैक्षणिक कार्य सुरू आहे.
. “या भारतात बंधुभाव नित्य वसू दे “
हे फक्त भजन नव्हते तर भारताच्या सामाजिक एकात्मतेचे ‘राष्ट्रगीत’ मानले जाते. ३० एप्रिल राष्टसंतांचा जन्मदिवस हा त्यांच्या नावाने साजरा न करता तो ग्रामजयंती म्हणून साजरा केला जातो. ग्रामाग्रामात सर्वांनीसामुदायिक प्रार्थना घेऊन ग्रामस्वच्छतेचे, श्रमदानाचे कार्यक्रम घेऊन रामधूनच्या माध्यमातून प्रबोधन करावे. ही उत्तुंग संकल्पना त्यांनी आपल्या अनुयायांसमोर मांडली व स्वतः ग्रामाग्रामात अशाप्रकारचे कार्यक्रम घेऊन स्वतः सांगितलेल्या संकल्पनेचे प्रत्यक्ष आचरण केले.
” गावागावासी जागवा।
भेदभाव हा समूळ मिटवा।
उजळा ग्रामोत्रतीचा दिवा। तुकड्या म्हणे।। “
ग्रामोन्नतीचा दिवा सामुदायिक प्रार्थनेच्या संघटन शक्तीतून निर्माण होऊ शकतो या राष्ट्रसंतांच्या विचाराचे आज गरज आहे,म्हणूनच राष्ट्रसंतांच्या सामुदायिक प्रार्थनेचे मोल सर्वांनी जाणले पाहिजे.
✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९







