

▪️संतप्त जमावाचा कंपनी कॅम्पमध्ये घुसून तोडफोड; चार तास महामार्ग ठप्प
✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.२८मे):-राजुरा–आसिफाबाद महामार्गावरील वरूर गावाजवळ आज सकाळी सहा वाजताच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात रामपूर येथील तरुण अंकित रमेश बोबाटे वय २६ वर्ष याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला असून संतप्त जमावाने संबंधित कंपनीच्या कॅम्पमध्ये घुसून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. काही कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकित बोबाटे हा आपल्या आई-वडिलांना सावनेर येथे मुलीकडे जाण्यासाठी राजुरा बसस्थानकावर सोडून आपल्या शेतातील कुक्कुटपालन व्यवसायाच्या ठिकाणी जात होता. तो आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.३४डब्ल्यू ६१०७ ने वरूर मार्गे जात असताना जी.आर.एल. कंपनीच्या ट्रक क्रमांक बिआर ३७ जीए ६४५५ ने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत अंकितचा जागीच मृत्यू झाला. मुख्य म्हणजे अंकित जखमी अवस्थेत तिथे तडफडत होता काही तास मात्र कंपनी समोरच व कंपनीच्याच गाडीने अपघात होऊन त्याच्या मदतीला कोणीही धाऊन आले नाही अखेर तडफडत अधिक रक्तस्त्राव होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला.
या मार्गावर काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे . यापूर्वीही अनेक अपघात झाले आहे. आजही होतच आहे ही अपघाताची मालिका थांबता थांबेना अशी झाली आहे. मात्र यावर उपाययोजना होताना दिसत नाही आहे. घटनेची माहिती मिळताच रामपूर गावात शोककळा पसरली. अंकित हा कुटुंबाचा प्रमुख आधार होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्याच्या अकाली निधनामुळे बोबाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावर तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन केले.
संतप्त जमावाने संबंधित कंपनीच्या कॅम्पमध्ये प्रवेश करून वाहनांची तोडफोड केली तसेच काहींना मारहाण केल्याची माहिती आहे. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढविला.यानंतर कंपनी प्रशासनासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आमदार तथा शेतकरी नेते अँड वामनराव चटप, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील उरकुडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चर्चेनंतर मृतकाच्या कुटुंबाला सहा लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर रामपूर येथून राजुरा मोक्षधाम येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंकितवर अंत्यसंस्कार करण्यात आले.







