Home महाराष्ट्र यशवंत सेनेच्या पत्रकार परिषदेत आरोप–प्रत्यारोपांचा पाढा

यशवंत सेनेच्या पत्रकार परिषदेत आरोप–प्रत्यारोपांचा पाढा

92

▪️प्रशासकीय काळातील कारभारास बगल

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.29मे):-शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका अपेक्षित असताना, यशवंत सेनेच्या पत्रकार परिषदेत मात्र आरोप–प्रत्यारोप आणि तक्रारींचाच सूर अधिक ठळक राहिला. आज आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गटनेते ॲड. सय्यद अकबर, उपाध्यक्ष सत्यपाल साळवे यांच्यासह नगरसेवक व सभापती उपस्थित होते.

१४ मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील मंजूर–नामंजूर ठरावांचे वाचन करताना कारभारात पारदर्शकता नसल्याचे, नगरसेवकांना विश्वासात न घेतल्याचे, तसेच रितसर एजेंड्यावर विषय न आणल्याचे आरोप करण्यात आले. मात्र या कथित त्रुटींवर मुख्याधिकारी वा नगराध्यक्षा यांच्याशी थेट संवाद न साधता, थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने व तक्रारी सादर केल्याचे छायांकित अर्ज दाखवत सांगण्यात आले.

नगराध्यक्षा व त्यांच्या कुटुंबीयांवर टीकेची झोड उठवत, “नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा देण्यात आला. २००० ते २०१६ या काळातील एकाधिकारशाही चालू देणार नसल्याचे ठामपणे सांगत, २०२५–२६ मध्ये पूर्ण झालेल्या कामांची देयके तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली. २०११ सुधारणा अधिनियमाअंतर्गत अध्यक्षांच्या स्वाक्षरीचे अधिकार गोठविल्याचा मुद्दाही उपस्थित झाला.

ठराव क्रमांक १८ संदर्भात “एकाच ठरावाआड नगरसेवक आणि त्यांना निवडून देणाऱ्या १५ हजार नागरिकांना वेठीस धरण्याचा डाव बहुमताने फेटाळला,” असा दावा करत, हा विरोध विकासाविरोधात नसून हुकूमशाहीविरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तर वर्तमान पत्रातुन ६कोटी रुपयाचं गैर व्यवहारामुळे नियम बाह्य कर्मचारी भरती तुन सहा साडेसहा कोटी रुपयांचा आकडा समोर आला त्याचा निम्मा भाग कोणत्या लोकप्रतिनिधी मागितला ह्याचा खुलासा कोण करणार ते वाटेकरी कोण अशी चर्चा जनतेत होत आहे असा अप्रत्यक्ष आरोप या पत्रकार परिषद मध्ये करण्यात आला आहे.

मात्र या सर्व गदारोळात प्रशासकीय काळातील वादग्रस्त भरती, सर्व्हे नंबर २४८ वरील गाळे—जे राज्यात विक्रमी वेगाने एका महिन्यात उभारून वाटप करण्यात आले या गंभीर मुद्द्यांना जाणूनबुजून बगल देण्यात आल्याची चर्चा रंगली. परिणामी, परिषद आरोप–प्रत्यारोपांच्या पाढ्यानेच आटोपली.

एकूणच, राजकीय रणधुमाळीत शहराच्या दैनंदिन समस्यांवर ठोस उत्तर मिळाले नाही आणि गंगाखेडकरांचा ‘आमच्यासाठी काय?’ हा प्रश्न आजही अनुत्तरितच राहिला.