Home महाराष्ट्र खान्देशासाठी आनंदवार्ता : उधना-पुणे नवीन रेल्वे गाडीला हिरवा कंदील…!

खान्देशासाठी आनंदवार्ता : उधना-पुणे नवीन रेल्वे गाडीला हिरवा कंदील…!

394

▪️खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि.26फेब्रुवारी):-खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. उधना-पुणे व्हाया नंदुरबार, शिंदखेडा, दोंडाईचा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, मनमाड मार्गावर नवीन रेल्वे गाडी सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असून, संबंधित प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती ZRUCC सदस्य तथा धरणगाव प्रवासी मंडळाचे पदाधिकारी श्री. प्रतीक जैन यांनी दिली. या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.

          मुंबई येथे पार पडलेल्या पश्चिम रेल्वेच्या ZRUCC (झोनल रेल्वे यूजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी) बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत जनरल मॅनेजर प्रदीप कुमार, डीजीएम उज्वल देव, पीसीएसओ अनिल कुमार जैन, सीपीआरओ विनीत अभिषेक आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. बैठकीदरम्यान ZRUCC सदस्य प्रतीक जैन यांनी खान्देशातील प्रवाशांच्या अडचणी, स्थानिक मागण्या आणि रेल्वे सुविधांबाबत ठोस व ज्वलंत प्रश्न प्रभावीपणे मांडले. 

यामध्ये प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे होत्या : 

*उधना-पुणे नवीन रेल्वे गाडी सुरू करणे, बंद झालेली सुरत-भुसावल पॅसेंजर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पुन्हा सुरू करणे, ताप्ती गंगा एक्सप्रेस व बरोनी एक्सप्रेस ला धरणगाव येथे थांबा देणे, सुरत-अमरावती एक्सप्रेस आठवड्यातील सातही दिवस चालविणे, प्रेरणा एक्सप्रेस ला अमळनेर येथे थांबा मिळविणे, भुसावल-नंदुरबार एक्सप्रेस सुरतपर्यंत वाढविणे, ०९०५१/५२/४९/५० भुसावल-दादर विशेष गाडी कायमस्वरूपी करणे. धरणगाव व अमळनेर येथे हॉलिडे एक्सप्रेस थांबा, चेन्नई-भगत की कोठी एक्सप्रेसला धरणगाव व अमळनेर थांबा, भोणे स्टेशन येथे मेमो थांबा मिळावा. धरणगाव व अमळनेर येथे अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेची गती तसेच धरणगाव येथे मालधक्का सुरू करणे.

या सर्व मागण्यांवर रेल्वे प्रशासनाकडून संमिश्र परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. विशेषतः उधना-पुणे नवीन गाडीबाबत चर्चेत आशादायी संकेत मिळाल्याने खान्देशातील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. स्थानिक प्रवासी व नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, उधना-पुणे थेट गाडी सुरू झाल्यास विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि नोकरीधारकांना मोठा फायदा होईल. प्रवास अधिक सोयीचा व वेळ वाचवणारा ठरेल. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून अंतिम वेळापत्रक व अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित असल्याने प्रवाशांचे लक्ष आता पुढील घडामोडींवर लागले आहे. खान्देशाच्या रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा होण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.