Home महाराष्ट्र राज्यात सिलिंडर तुटवडा तात्काळ थांबवा-वंचित बहुजन आघाडीचे निदर्शन आंदोलन

राज्यात सिलिंडर तुटवडा तात्काळ थांबवा-वंचित बहुजन आघाडीचे निदर्शन आंदोलन

91

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

 ब्रम्हपुरी(दि.8एप्रिल):- राज्यभर सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर” या घोषणेसह जोरदार निदर्शन आंदोलन करण्यात आले. आंदोलनातून प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

       गॅस सिलेंडरसाठी तासन्‌तास रांगेत उभे राहण्याची वेळ नागरिकांवर आली असून या गंभीर परिस्थितीत अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाठ यांचा रांगेत उभे असतानाच मृत्यू झाला. तसेच अमरावती येथेही एका तरुणाचा गॅस सिलेंडरसाठी प्रतीक्षा करताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. गॅस टंचाईचा थेट परिणाम घरगुती तसेच व्यावसायिक जीवनावर होत असून स्वयंपाकघरातील शेगड्या थंड पडल्या आहेत. चहाच्या टपऱ्या, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते व छोटे व्यावसायिक यांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांना कोळसा व लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.

       राज्यातील अनेक शहरांमध्ये हॉटेल्समध्ये चहा, नाश्ता, इडली, डोसा यांसारख्या पदार्थांची विक्री बंद झाली असून लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम व केटरिंग व्यवसाय गॅसअभावी पुढे ढकलले जात आहेत. शिक्षणासाठी बाहेरगावी आलेल्या विद्यार्थ्यांना मेसमध्ये जेवण मिळत नसल्याने अनेकांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एलपीजी टंचाईमुळे रिक्षा भाड्यात वाढ झाली असून त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर बसत आहे. काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असून ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत दर आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही प्रकरणांमध्ये सिलेंडरमध्ये पाणी भरल्याच्याही तक्रारी आहेत.

       ११ मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेला इशारा आता प्रत्यक्षात उतरल्यानंतर सरकारवरील टीका तीव्र झाली आहे. सरकार परिस्थिती सामान्य असल्याचा दावा करत असताना प्रत्यक्षात नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे चित्र आहे. या आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडी ब्रम्हपुरी च्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत केंद्रसरकार व राज्यसरकार यांना निवेदन देण्यात आले.

गॅसची कृत्रिम टंचाई थांबवणे, काळाबाजार रोखणे, वितरण नियम शिथिल करणे, विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करणे व उज्ज्वला योजनेचे ऑडिट करणे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष लिलाधर वंजारी, जि उपाध्यक्ष डि एम रामटेके, जि सचिव अरुण सुखदेवे, ता महासचिव नरेंद्र मेश्राम, सदस्य घनशाम रामटेके, ता संघटक गणेश महाजन, विलास रामटेके,ता सदस्य धनपाल वंजारी, युवक आघाडीचे उपाध्यक्ष अमीर वंजारी, पक्षाचे कार्यकर्ते सुरज मेश्राम, मयुर चहांदे, सुनील साळवे, पत्रकार राहुल भोयर, करुणा मेश्राम, विश्रांती रामटेके, कुंदा बागडे, माया सोंडवले, संघमित्रा फुलझेले आदि प्रामुख्याने उपस्थित होते तथा यावेळी असंख्य पिडीत नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते

        “मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा सुद्धा पक्षाच्या वतीने यावेळी देण्यात आला.